कोल्हापूर : ऐन गणेशोत्सवात शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. थेट पाइपलाइनमधील अडथळे, उपाययोजना आणि त्यासाठीचा निधी याबाबत येत्या १५ दिवसांत बैठक घेण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार अमल महाडिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.महाडिक म्हणाले, सणासुदीत पाण्यासाठी धावपळ करावी लागणे योग्य नाही. त्यामुळे काल दिवसभर मी याबाबत माहिती घेतली. काळम्मावाडी धरणस्थळावरही जाऊन आलो. या योजनेसाठीचा विद्युतपुरवठा खुल्या वाहिन्यांद्वारे करण्यात आला आहे. त्यावर पक्षी बसले, माकडांनी उड्या मारल्या की लगेच विद्युतपुरवठा बंद होतो. म्हणूनच भूमिगत विद्युतवाहिनीसाठी १६ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.सध्या या ठिकाणी तीन नियमित पाणी उचलण्यासाठी आणि एक पंप पर्याय म्हणून आहे. आणखी दोन पंप आणि स्वतंत्र इलेक्ट्रानिक पॅनलसाठीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी दिल्या असून, त्या निधीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.शिंगणापूरची जुनी योजनाही पर्याय म्हणून सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच जुनी योजनाही अद्ययावत करण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे १५ दिवसांत मुबलक आणि वेळेत पाणीपुरवठा होईल. शिंगणापूर, बालिंगा येथून उपसा
योजना बनवतानाच लक्ष देण्याची गरज होतीमहाडिक म्हणाले, ही मोठी योजना आहे. त्यामुळे सगळे पार्ट येथे उपलब्ध नाहीत. पुण्या, मुंबईत हे सुटे भाग आहेत. एक दुरुस्त करायला गेल्यानंतर दुसरे नादुरुस्त होते अशी परिस्थिती आहे. परंतु योजना तयार करतानाच त्यातील संभाव्य अडचणींचा विचार होणे अपेक्षित होते. अजूनही याच कंपनीकडे अडीच वर्षे देखभाल दुरुस्ती आहे.
महाडिक धरणावर, पाठोपाठ आयुक्तही गेल्याशहरातील एकूणच पाणीटंचाईची स्थिती पाहून आमदार महाडिक बुधवारी दुपारीच काळम्मावाडी धरणावर गेले. दोन तास थांबून तेथील प्रश्न त्यांनी जाणून घेतले आणि त्याच्या उपाययोजनांबाबतही चर्चा करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सणादिवशीच आमदार तिकडे गेल्याने रात्री आयुक्त के. मंजुलक्ष्मीही धरणस्थळावर पोहोचल्या आणि त्यांनीही तातडीने उपाययोजनेच्या सूचना केल्या.