Kolhapur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी पन्हाळ्यावर, आमदार विनय कोरे शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:16 IST2025-02-26T13:13:42+5:302025-02-26T13:16:15+5:30
लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार

Kolhapur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी पन्हाळ्यावर, आमदार विनय कोरे शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत
कोल्हापूर : पन्हाळा नगरपरिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या इंटरप्रिटेशन सेंटर उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी किल्ले पन्हाळ्यावर येणार आहेत. आमदार विनय कोरे यांच्या पुढाकारातून होणाऱ्या या कार्यक्रमाला निम्मे मंत्रिमंडळ उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. कोरे या निमित्ताने मोठे शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
गेले दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात फडणवीस यांच्या आगामी दौऱ्याबाबत चर्चा सुरू आहे. या सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शिव छत्रपतींवरील माहितीपटाचेही प्रदर्शन यावेळी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाची तयारी युध्दपातळीवर सुरू करण्यात आली आहे.