Kolhapur Circuit Bench: सरन्यायाधीशांनी दिलेला शब्द खरा करून दाखविला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 13:23 IST2025-08-02T13:22:20+5:302025-08-02T13:23:51+5:30
चार दिवसांपूर्वी खासदार शाहू छत्रपती यांनी गवई यांची भेट घेऊन सर्किट बेंचची आवश्यकता का आहे, याची माहिती देऊन आठवण करून दिली होती

संग्रहित छाया
कोल्हापूर : ‘राजर्षी शाहू छत्रपती महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आम्हा बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली. वकील झालो, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश झालो. ही छत्रपती शाहू महाराजांची कृपा आहे. त्यांचे ऋण फेडता येणे अशक्य आहे. तरीही मी कोल्हापूरसाठी सर्किट बेंच सुरू करून या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रयत्न करणार आहे’, अशी नि:संदिग्ध ग्वाही भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही महिन्यांपूर्वी दिली होती, गवई यांनी सर्किट बेंच मंजूर करून हा शब्द खरा करून दाखविला.
सरन्यायाधीश भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली तेंव्हा ते कोल्हापूरला आले होते. यावेळी त्यांनी न्यू पॅलेसवर खासदार शाहू छत्रपती यांची भेट घेऊन त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली होती. यावेळी संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती व ॲड. आर. एल. चव्हाण उपस्थित होते. छत्रपती परिवाराने गवई यांचा यथोचित सन्मान केला होता.
वाचा : चार लाख खटल्यांच्या कामकाजाला येणार गती
यावेळी झालेल्या चर्चेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आम्हा बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली. त्यांचे ऋण आम्हावर आहेत. त्यामुळे कोल्हापूरसाठी काही तरी करण्याची माझी इच्छा आहे. सर्किट बेंचची मागणी पुढे आली आहेच. कोल्हापूरला सर्किट बेंच देण्याच्या मागणीला माझा पाठिंबा राहिल, असे गवई यांनी सांगितले होते.
वाचा: उच्च न्यायालयाचे खंडपीठ-सर्किट बेंचमध्ये फरक काय ?
चार दिवसांपूर्वी खासदार शाहू छत्रपती यांनी गवई यांची भेट घेऊन सर्किट बेंचची आवश्यकता का आहे, याची माहिती देऊन आठवण करून दिली होती. त्यानंतर चार दिवसात नोटिफिकेशन काढून गवई यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता केली.
संभाजीराजेंना दिली माहिती
शुक्रवारी सरन्यायाधीश भूषण गवई दिल्लीहून नागपूरला विमानाने चालले होते. त्यांच्या शेजारीच संभाजीराजे यांची जागा होती. गवई यांनी संभाजीराजे यांना पाहताच आनंदाची बातमी तुम्हाला देतोय, असे सांगत सर्किट बेंचचे आजच नोटिफिकेशन काढल्याचे सांगितले. त्यानंतर संभाजीराजे यांनी खासदार शाहू छत्रपती यांना फोन करून ही बातमी सांगितली.