Kolhapur: लॅबचालकांची यादी तपासल्यास सत्य समोर, 'सीपीआर'मधून खासगीत रूग्ण पळवणारी टोळी सक्रिय
By भीमगोंड देसाई | Updated: December 4, 2025 12:14 IST2025-12-04T12:13:14+5:302025-12-04T12:14:12+5:30
गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी

Kolhapur: लॅबचालकांची यादी तपासल्यास सत्य समोर, 'सीपीआर'मधून खासगीत रूग्ण पळवणारी टोळी सक्रिय
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : सीपीआरमध्ये रक्ताची गरज असलेल्या विभागात दाखल झालेल्या रुग्णांची यादी आणि परिसरातील खासगी रक्त चाचणी करणाऱ्या लॅबचालकांकडे रक्त तपासणी केलेल्या रक्ताची यादी तपासली तर मोठे घबाड समोर येणार आहे.
चौकशी समितीने चौकशीत याचीही सखोल चौकशी करावी आणि सीपीआरमधील गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, सीपीआरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना आपल्या खासगी दवाखान्यात नेण्याची टोळीही सक्रिय असल्याचा आरोप होत आहे.
सीपीआरमध्ये काही डॉक्टर आणि खासगी रक्त तपासणी लॅबचालकांतील अर्थपूर्ण लागेबांधे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केले. केवळ उघड करून न थांबता बेकायदेशीरपणे नातेवाईकांकडून घेतलेले पैसेही परत करण्यास भाग पाडले. यामुळे सीपीआरमधील नातेवाईकांकडून होणारी पैशाची लूट चव्हाट्यावर आली आहे.
याची दखल पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही घेतली आहे. त्यांनी या प्रकरणातील आणि रुग्णांवर जाणीवपूर्वक उपचार करण्यात दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सीपीआर प्रशासन हडबडून जागे झाले आहे.
बोगस दिव्यांग दाखलेही... कारवाई प्रलंबित
सीपीआरमध्ये बोगस दिव्यांग दाखले दिल्याचे प्रकरणही उघड झाले आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे प्रशासनाने केली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाई प्रलंबित आहे.
समिती निपक्षपातीपणे चौकशी करणार का ?
खासगी रक्त तपासणी लॅबचालकांकडून सीपीआरमधील रुग्णांच्या नातेवाईकांकडून गोळा केलेले पैसे प्रकरणाच्या चौकशीसाठी सीपीआरमध्ये चौकशी समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये सर्व सदस्य सीपीआरमधीलच अधिकारी, डॉक्टर आहेत. त्यांच्याकडून सीपीआरमधील दोषी डॉक्टरांना शोधून काढण्याचे काम निपक्षपातीपणे आणि निर्भयपणे होणार का ? असा प्रश्न तक्रारदार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष रूपेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.
वसुलीत कारभारी डॉक्टर अधिकारी मास्टरमाईंड
सीपीआरच्या वरिष्ठ अधिकारी पदावर कोणीही आले तरी त्यांच्या मागे, पुढे फिरत राहणारा आणि अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी तळ ठोकून असणारा एक डॉक्टर अधिकारी वरकमाईचा मास्टरमाईंड असल्याचे बोलले जाते. तोच वरकमाईची जोडणी लावतो आणि कमाईचा वाटाही ठरवतो, अशाही तक्रारी आहेत. त्याच्या विरोधात कोणी डॉक्टराने तक्रार केली तर त्या डॉक्टरांच्या विरोधात काही संघटनांना फूस लावून तक्रार करायलाही तो लावतो. अशाप्रकारे त्याने आपली दहशत सीपीआरमध्ये तयार केली आहे, अशी चर्चा आहे.