Kolhapur: जीबीएस सिंड्रोम रोखण्यासाठी पाण्याचे नमुने तपासा, जिल्हास्तरीय बैठकीत सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:13 IST2025-01-30T12:12:38+5:302025-01-30T12:13:34+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात जीबीएस सिंड्रोम आजाराचे दोन रुग्ण आढळले आहेत, त्या परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन संबंधित पाण्याचे स्त्रोतही तपासा. ...

Kolhapur: जीबीएस सिंड्रोम रोखण्यासाठी पाण्याचे नमुने तपासा, जिल्हास्तरीय बैठकीत सूचना
कोल्हापूर : जिल्ह्यात जीबीएस सिंड्रोम आजाराचे दोन रुग्ण आढळले आहेत, त्या परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन संबंधित पाण्याचे स्त्रोतही तपासा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जीबीएसबाबत आवश्यक माहिती लोकांना द्या, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बुधवारी दिल्या. गर्भलिंग निदान विरोधात छापा टाकून एजंट तसेच डॉक्टरांचे नेटवर्क शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करा, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. हर्षला वेदक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, डॉ. फारूख देसाई यांच्यासह समिती सदस्य, तालुका आरोग्याधिकारी उपस्थित होते. तीन तास झालेल्या बैठकीत कार्तिकेयन यांनी सर्व विभागांना सूचना दिल्या.
गर्भलिंग निदान विरोधात धाडी टाका
अवैध गर्भलिंग निदान तपासणी मोहिमेंतर्गत सोनोग्राफी सेंटरची तपासणी करा. मशीनचे एफ फॉर्म तपशीलवार पाहा. पोर्टेबल मशीनद्वारे गर्भलिंग निदान तपासणी केली जाते, गर्भपाताची औषधे विकली जातात का याची तपासणी करा. गर्भपातासाठी आलेल्या महिलांचा इतिहास जाणून घ्या.
बोगस डॉक्टरबाबत तक्रार पेटी ठेवा
बोगस डॉक्टर तपासणीसाठीची यादी अधिकाऱ्यांना द्या. नवा दवाखाना सुरू करताना वैद्यकीय अधिकाऱ्याचा किंवा जवळील शासकीय दवाखान्यातील प्रमुखाचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यायला सांगा. बोगस डॉक्टर आढळल्यास पोलिस पाटील यांना माहिती द्या. तालुक्याच्या ठिकाणी बोगस डॉक्टरबाबत स्वतंत्र ‘तक्रार पेटी’ ठेवा. तपासणी मोहीम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा.
तंबाखू खाल्ल्यास कारवाई
तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत ही मोहीम राबवताना जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभागांनी एकत्र जावे. शासकीय कार्यालयात याचे सेवन करणारे अधिकारी कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केल्याचे तपशील द्या. पोलिस, आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाईच्या संख्येत वाढ करावी.
क्षयरोग मुक्त जिल्ह्यासाठी..
क्षयरोग निर्मूलन अभियानांतर्गत संदिग्ध रुग्णांच्या एक्स-रे संख्या वाढवा. टीबीमुक्त जिल्हा करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. यावेळी झालेल्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी माहिती दिली.