Kolhapur Crime: आर्थिक फसवणुकीच्या ३७ पैकी ११ गुन्ह्यांतच आरोपपत्र, तपास संथ गतीने
By उद्धव गोडसे | Updated: February 3, 2025 18:44 IST2025-02-03T18:21:29+5:302025-02-03T18:44:30+5:30
अनेक संशयित मोकाटच

Kolhapur Crime: आर्थिक फसवणुकीच्या ३७ पैकी ११ गुन्ह्यांतच आरोपपत्र, तपास संथ गतीने
उद्धव गोडसे
कोल्हापूर : आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण घटत असले, तरी दाखल गुन्ह्यांचा सखोल तपास करणे आणि अटकेतील संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्याची गती संथ आहे. शाहूपुरी पोलिसांनी गेल्या वर्षभरातील ३७ पैकी ११ गुन्ह्यांमधील २३ संशयितांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरूच असून, अजूनही अनेक संशयित मोकाट आहेत. आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलिसांना विशेष मोहीम राबवावी लागणार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेअर मार्केटशी संबंधित अनेक बोगस कंपन्या, गुंतवणूक सल्लागारांची कार्यालये आणि भामट्यांनी ठाण मांडले होते. कोरोना काळात त्यांनी अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. वर्षभरातच त्यांचे बिंग फुटले आणि फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेण्यास सुरुवात केली. यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांत शाहूपुरी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमालीचे वाढले होते.
२०२२-२३ मध्ये ९० गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून सुरू होता. यातील काही मोठे गुन्हे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवले होते. पोलिसांनी प्राधान्याने या गुन्ह्यांचा तपास करून संशयितांना अटक करण्याचा धडाका लावल्याने फसवणुकीचे प्रकार घटले. २०२४ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे ३७ गुन्हे दाखल झाले.
२३ जणांवर आरोपपत्र
पोलिसांनी ३७ गुन्ह्यांतील २४ आरोपींना अटक केली. यातील ११ गुन्ह्यांतील २३ जणांवरील आरोपपत्र तयार करून ते न्यायालयात दाखल केले आहे. सध्या यावरील सुनावण्या सुरू आहेत. न्यायालयात भक्कम पुरावे आणि साक्षी सादर करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवणार असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.
१५ कोटींची फसवणूक
एकूण ३७ गुन्ह्यांमध्ये १५ कोटींची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षात ही फसवणूक सुमारे दीडशे कोटींवर आहे. अनेक गुंतवणूकदार तक्रारी देण्यासाठी पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या फसवणुकीची रक्कम पोलिसांच्या रेकॉर्डवर येत नाही.
या गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल
आरोपपत्र दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये मेकर ॲग्रो, सान्विक ट्रेडिंग, ई-स्टोअर, वेल्थ शेअर या प्रमुख गुन्ह्यांचा समावेश आहे. गरजेनुसार पुरवणी आरोपपत्रही दाखल केली जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
- एकूण गुन्हे - ३७
- संशयित आरोपी - दीडशेहून जास्त
- फसवणुकीची रक्कम - १५ कोटी
- अटक आरोपी - २४
- दोषारोप दाखल गुन्हे - ११
- दोषारोप दाखल आरोपी - २३
पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार प्रलंबित आर्थिक गुन्ह्यांचा प्राधान्याने तपास केला जात आहे. यातून काही गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात यश आले. लवकरच त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले जाईल. - संतोष डोके, पोलिस निरीक्षक, शाहूपुरी पोलिस ठाणे