पालकमंत्री परदेशातून आल्यावरच पदाधिकारी बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST2021-02-05T06:56:50+5:302021-02-05T06:56:50+5:30

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील हे आठ दिवसांसाठी परदेशामध्ये गेल्यामुळे ते आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलाबाबतची बैठक होणार आहे. ...

Change of office bearers only when the Guardian Minister comes from abroad | पालकमंत्री परदेशातून आल्यावरच पदाधिकारी बदल

पालकमंत्री परदेशातून आल्यावरच पदाधिकारी बदल

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील हे आठ दिवसांसाठी परदेशामध्ये गेल्यामुळे ते आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलाबाबतची बैठक होणार आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनाम्याची सूचना दिल्याची चर्चा बुधवारी जिल्हा परिषदेत होती. मात्र, आपण तशा कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाचा विषय आणखी आठ दिवस पुढे गेल्याचे मानण्यात येते.

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना १ जानेवारीला आणि चारही सभापतींना १६ जानेवारीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत चर्चेला जोर आला होता. मुश्रीफ यांनीही आपल्या महिन्याभरातील काही भाषणांमध्ये पदाधिकारी बदलाबाबत सूतोवाच केले होते. परंतु, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली. त्यानंतरच्या जिल्हा नियोजन समितीनंतर तातडीने राजीनामे घेतले जातील, अशी चर्चा होती. परंतु, पालकमंत्री पाटील हे आठ दिवसांसाठी परदेशात गेल्यामुळे ही प्रक्रिया थांबली आहे.

चौकट

राहुल पाटील यांच्या दावेदारीची चर्चा

आधी अध्यक्षपदाच्या चर्चेत नसलेले आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल यांनी अध्यक्षपदासाठी दावा केल्याने बुधवारी जिल्हा परिषदेत याची चर्चा सुरू होती. शरद पवार यांच्याही कार्यक्रमादिवशी राहुल हे व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार पाटील यांनी राहुल यांच्यासह शरद पवार यांची भेट घेऊन अध्यक्षपदाची मागणी केल्यामुळे हा विषय आता प्रदेश पातळीवर जाणार असल्याचे मानण्यात येते. सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्याला एक वर्ष संधी मिळाली आहे. आता पी.एन. यांच्या गटाला संधी मिळावी असा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्याची तयारी सुरू आहे.

मी कोणालाही राजीनामे द्या असे सांगितलेले नाही. कोणतीही बैठकही बोलावलेली नाही. सतेज पाटील हे परदेशात आहेत, ते आल्यानंतर मग बघू.

हसन मुश्रीफ

ग्रामविकास मंत्री

Web Title: Change of office bearers only when the Guardian Minister comes from abroad