सकाळी ढगाळ...दुपारनंतर ऊन, कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाची शक्यता; आठवडाभर ढगाळ हवामानाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 12:35 IST2023-04-29T12:35:36+5:302023-04-29T12:35:49+5:30
ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक फटका भाजीपाल्याला

सकाळी ढगाळ...दुपारनंतर ऊन, कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाची शक्यता; आठवडाभर ढगाळ हवामानाचा अंदाज
कोल्हापूर : जिल्ह्यात आज, शनिवार आणि काल, शुक्रवारची पहाट ढगाळ वातावरणाने झाली. दुपारी बारापर्यंत पावसाळी हवामान तयार झाले, त्यानंतर ऊन पडले. आज जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. शुक्रवारी सकाळपासून आकाश गच्च झाले होते. पाऊस सुरू होईल असेच वाटत होते. दुपारी बारापर्यंत ढगाळ हवामान राहिले. उन्हाचा पारा वाढल्याने सकाळी आठपासूनच अंगाकडून घामाच्या धारा वाहतात. मात्र, ढगाळ हवामानामुळे ऊन नसल्याने फारसा उष्मा जाणवत नव्हता.
शनिवारी तापमानात आणखी वाढ होऊन ते ३६ डिग्रीपर्यंत पोहोचणार आहे. पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली असून रविवारपासून तापमान ३६ ते ३७ डिग्रीपर्यंत स्थिर राहणार असले तरी किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी उष्मा वाढणार आहे. पुढील आठवड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
भाजीपाल्याला फटका
ढगाळ वातावरण हे किडीला पोषक असते. त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाल्याला बसतो. ऊस, भुईमूग पिकांना वळीव पाऊस उपयुक्त ठरत आहे.