Chandrakant Patil: चंद्रकांतदादांचे पुन्हा भाकित, आता म्हणाले फडणवीस वर्षभरातच मुख्यमंत्री होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 12:50 IST2022-04-29T12:48:06+5:302022-04-29T12:50:12+5:30
आजरा : महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकीत भाजप नेत्यांकडून अनेकवेळा करण्यात आलयं. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष ...

Chandrakant Patil: चंद्रकांतदादांचे पुन्हा भाकित, आता म्हणाले फडणवीस वर्षभरातच मुख्यमंत्री होणार
आजरा : महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकीत भाजप नेत्यांकडून अनेकवेळा करण्यात आलयं. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांनी अनेक तारखा देखील दिल्या. मात्र, त्यांची ही भाकिते फोल ठरली आहेत. यानंतर, पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील असे भाकित केले आहे. कोल्हापूर जिल्ह्रयातील आजरा तालुक्यात एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा हा दावा केला आहे.
येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री होतील व त्यांच्याच हस्ते स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांचा ६१ ची कार्यक्रम होईल असेही चंद्रकांतदादा म्हणाले. सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या स्वामी विवेकानंद पत संस्थेच्या वतीने उभारलेल्या श्री लक्ष्मी देवी उद्यान लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर तर प्रमुख उपस्थिती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके होते.
पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले यांनी स्वागत व प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी श्री लक्ष्मी देवी उद्यान संकल्पक पत्रकार समीर देशपांडे, उद्यान विकासक सुधीर कुंभार, मयूर कुंभार व श्री लक्ष्मी देवी यात्रा समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे वीर पिता व वीर माता यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास महादेव उर्फ बापू टोपले, विलास नाईक, मलिक बुरुड, नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर, सुधीर मुंज डॉ.अनिल देशपांडे,रमेश कारेकर, सरव्यवस्थापक आनंदा कुंभार यासह पतसंस्थेचे संचालक, सभासद व आजरेकर नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन समीर देशपांडे तर उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी आभार मानले.