"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:53 IST2025-11-25T12:41:24+5:302025-11-25T12:53:07+5:30
अर्थखाते राष्ट्रवादीकडे असले तरी, सरकारमध्ये अंतिम निर्णय आणि नियंत्रण भाजपच्याच नेतृत्वाखाली असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय

"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
Chandrakant Patil: राज्यात महायुतीच्या प्रमुख पक्षांमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आता अधिकच वाढला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील फोडाफोडी संपत नाही तोच, आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातही निधीवरून वाक्युद्ध सुरू झाले आहे. कोल्हापूरमधील गडहिंग्लज येथील प्रचार सभेत बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला कठोर इशारा दिला. अजित पवार यांनी मतदारांना तुमच्या हातात मत आहे, तर माझ्या हातात निधी आहे, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांच्या हातात असल्याचे म्हटलं.
चंद्रकांत पाटलांचा धारदार पलटवार
राष्ट्रवादीकडून वारंवार करण्यात येत असलेल्या या दाव्याला भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून जशास तसं उत्तर दिले आहे. "राज्याची तिजोरी आमच्याकडे आहे. त्यामुळे आमच्या उमेदवारांनाच मते द्या, असे कुणी म्हणत असले, तरी ‘त्या’ तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही. परवानाशिवाय तिजोरी उघडली, तर काय म्हणतात ? ते सगळ्यांना माहिती आहे," असा टोला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नामोल्लेख टाळून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना हाणला.
तर मीही बघत बसणार नाही - चंद्रकांत पाटील
गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीतील जनता दल, जनसुराज्य, भाजप, शिंदेसेना महायुतीच्या प्रचारासाठी ते गडहिंग्लजला आले होते.
"काठावरचे सरकार असेल, तर सरकार आज जाणार? उद्या जाणार? अशी चर्चा असते. मात्र, २८८ पैकी २३७ आमदार महायुतीचे आहेत. कुणी नाराज असला, कुणी बंड केले तरी हे सरकार अजून ४ वर्षे असणार आहे. केंद्रात व राज्यात आमचेच सरकार आहे. महायुती म्हणूनच लढण्याचा प्रयत्न करावा. वेगळे लढायचे असेल, तर एकमेकांवर टीका करू नये, असे ठरले आहे. गडहिंग्लजमध्ये महायुतीचा घटक असलेली राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला असून, त्याचे नेतृत्व मंत्री मुश्रीफ करीत आहेत. त्यामुळे मी टीका करणार नाही. तेही नियम पाळताहेत असे दिसते. पुढील ५-६ दिवसांत त्यांनी नियम मोडला, तर मीही काही बघत बसणार नाही," असा इशाराही मंत्री पाटील यांनी दिला.
...म्हणूनच मुश्रीफ-घाटगे एकत्र !
देवेंद्र फडणवीस हे लांबचा विचार करून योग्य निर्णय घेतात. त्यांची प्रत्येक गोष्ट तर्कावर आधारित असते. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याच्या फंद्यात आम्ही पडत नाही. त्यांच्यासोबत गेली ४०-४५ वर्षे काम केल्यामुळे तुमच्या मनात काय आहे ? असा प्रश्न विचारण्याचे धाडस माझ्यातच आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
संधीसाधू राजकारण जिल्ह्यात फार काळ चालणार नाही
मंत्री हसन मुश्रीफ हे युतीचा आग्रह धरतात. त्यामुळे कागलमध्ये राष्ट्रवादी, भाजपा व शिंदेसेना अशीच युती व्हायला हवी होती. परंतु, मुश्रीफ - समरजित घाटगे एकत्र येण्यासाठी भाजपाला अदृश्य व्हावे लागले. त्यांना कागलमध्ये आमची मदत हवी असली तरी चंदगडमध्ये ते आमच्यासोबत यायला तयार नाहीत. एका ठिकाणी एक अपेक्षा, तर दुसरऱ्या ठिकाणी दुसरी अपेक्षा असे संधीसाधू राजकारण सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात ते फार काळ चालणार नाही, अशी टिप्पणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
..तर निकालच लावला असता
आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगडमध्ये भाजपाच्या चिन्हावरच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. शिंदेसेना त्यांच्यासोबत आली. परंतु, राजेश पाटील व डॉ. नंदिनी बाभूळकर यांना ते मान्य झाले नाही. गडहिंग्लजमध्ये भाजपाने राष्ट्रवादीसोबत यावे, अशी मुश्रीफांची अपेक्षा होती. परंतु, जनता दल त्यांना नको होते. त्यामुळे कार्यकर्ते व नागरिकांच्या इच्छेनुसार आम्ही जनता दलासोबत युती केली आहे. माझ्याकडे आणखी वेळ असता तर निवडणुकीचा निकालच लावला असता, असा दावाही मंत्री पाटील यांनी केला.