मध्य रेल्वेने राज्यभरातील १४५ रेल्वेगाड्यांचे नंबर बदलले, कोल्हापुरातून धावणाऱ्या पाच रेल्वेगाड्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:21 IST2025-01-02T16:20:48+5:302025-01-02T16:21:05+5:30
ऑनलाइन सिस्टीम आज सुरू होणार

मध्य रेल्वेने राज्यभरातील १४५ रेल्वेगाड्यांचे नंबर बदलले, कोल्हापुरातून धावणाऱ्या पाच रेल्वेगाड्यांचा समावेश
कोल्हापूर : मध्य रेल्वेने राज्यभरातील १४५ रेल्वेगाड्यांचे नंबर बदलले आहेत. यामध्ये कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज टर्मिनन्समधून धावणाऱ्या पाच रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, हे क्रमांक बदलण्यासाठी बुधवारी रेल्वे प्रशासनाने काही सेवा बंद ठेवल्या. गुरुवारी (दि. २) सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा या सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाकडून विविध मार्गावरील रेल्वेगाड्यांचे क्रमांक बदलण्याचे काम सुरू आहे. नव्या बदललेल्या क्रमांकानुसार प्रवाशांना आता नवीन क्रमांकांचा वापर करावा लागणार आहे. ऑनलाइन बुकिंग करणे, आरक्षण, ऑनलाइनने गाड्यांची सद्य:स्थिती पाहण्यासाठी नवीन क्रमांकानुसार पाहावे लागणार आहे. डेमू सातारा-कोल्हापूर ७१४२३, डेमू मिरज-कोल्हापूर ७१४२५, डेमू कोल्हापूर-मिरज ७१७२८, डेमू कोल्हापूर-सांगली ७१४३०, डेमू मिरज-कोल्हापूर ७१४२९ असे नवे क्रमांक आहेत.
ऑनलाइन यंत्रणा आजपासून सुरू
रेल्वेच्या गाड्यांचे क्रमांकामध्ये बदल करण्याच्या कामामुळे रेल्वे प्रशासनाने बुधवारी संगणीकृत यंत्रणा बंद केली. त्यामुळे ऑनलाइन बुकिंग, तत्काळ आरक्षण, चार्ट प्रदर्शन, टच स्क्रीन, परतावा खिडकी या सेवा ३१ डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्रीपासून ते १ जानेवारी रात्री १:१५ पर्यंत बंद ठेवल्या. या पुन्हा गुरुवारपासून सुरू होत असल्याचे पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले.
बदललेल्या वेळेनुसार रेल्वे कोल्हापुरात दाखल
कोल्हापूर : मध्य रेल्वे प्रशासनाने बदल केलेल्या वेळेनुसार बुधवारपासून अंमलबजावणी सुरू झाली. कोल्हापुरातून सुटणाऱ्या ११ तसेच कोल्हापुरात येणाऱ्या ३ रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. यात सातारा-कोल्हापूर डेमूचा समावेश असून, बुधवारी पहिल्याच दिवशी सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवर दाखल झाली. रेल्वे प्रवासी संघटनांनी काही रेल्वेच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बदल झाल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
सातारा-कोल्हापूर डेमू रेल्वेच्या वेळेत बदल करण्याची मागणी कोल्हापूर प्रवासी संघटनेने केली होती. ही रेल्वे कोल्हापुरात अर्धातास आधी सकाळी ९.२६ वाजता आल्याने प्रवाशांंनी समाधान व्यक्त केले. सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले येथून दररोज कोल्हापुरात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामध्ये विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांचा समावेश असून, यापूर्वी ही रेल्वे सकाळी सव्वादहा वाजता स्थानकावर येत होती. त्यामुळे बहुतांशी जणांना कार्यालय, शाळा, कॉलेजमध्ये उशिरा पोहोचत होते.
नवीन वेळेनुसार आलेल्या रेल्वे
- कोल्हापूर - पुणे डेमू : पहाटे ५ वाजताऐवजी पहाटे ५.१० मिनिटे
- कोयना एक्स्प्रेस : सकाळी ८.१५ ऐवजी सकाळी ८.२५,
- हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस : सकाळी ९.१० ऐवजी सकाळी ९.३५.
- कोल्हापूर-मिरज डेमू : सकाळी १०.३० ऐवजी सकाळी १०.२५
- कोल्हापूर-तिरूपती सकाळी ११.४० ऐवजी सकाळी ११.४५ वा.
- कोल्हापूर-अहमदाबाद दुपारी १.१५ ऐवजी दुपारी १.३०
- महाराष्ट्र एक्स्प्रेस दुपारी २.४५ ऐवजी दुपारी २.५०
- कलबुर्गी एक्स्प्रेस दुपारी ३ ऐवजी दुपारी ३.०५ वा.
- कोल्हापूर-सांगली डेमू सायंकाळी ७.४० ऐवजी सायंकाळी ७.३५
- महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री ८.५० ऐवजी रात्री ८.५५ वा.