सावधान... कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:28 AM2021-02-17T04:28:30+5:302021-02-17T04:28:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी झालाय... त्यावरील लस सुध्दा उपलब्ध झालीय... आता आपणाला काय होतंय... गेल्यावर्षी ...

Caution ... Corona is raising her head again | सावधान... कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय

सावधान... कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी झालाय... त्यावरील लस सुध्दा उपलब्ध झालीय... आता आपणाला काय होतंय... गेल्यावर्षी मार्च २०२० मध्ये आपण सगळे याच अविर्भावात होतो. सगळे गाफील राहिलो आणि बघता बघता उद्रेक झाला. आरोग्य यंत्रणा कोलमडली, परिस्थिती हाताबाहेर गेली. उपचार मिळेनात, रुग्णालयात बेड मिळेना... अशी परिस्थिती पुन्हा उद्भवायची नसेल, तर स्वत:ची काळजी घ्या, मास्क लावा, शारीरिक अंतर ठेवा... होय, कोरोना संसर्ग पुन्हा वाढतोय.

गतवर्षीच्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील आजची कोरोनाची स्थिती सामान्य आहे. रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा खूप कमी झाली आहे. आरोग्य यंत्रणेसह सर्वच नागरिक बिनधास्त झाले आहेत. आता कोरोना संपला, लस आलेली आहे, आता काही होणार नाही... असाच समज अनेकांचा झाला आहे. परंतु हा समज काहीसा आत्मघातकी ठरू शकतो. कोरोना विषाणूंचा संसर्ग कमी झाला असला तरी तो संपलेला नाही. धोका आजही कायम आहे.

जगाच्यादृष्टीने वाईट ठरलेले २०२० साल संपले, त्यालाही दीड महिना झाला. लस निघाल्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी होईल असे सगळ्यांनाच वाटत होते. मात्र हा विषाणू पुन्हा डोकं वर काढत असल्याचे राज्यातील काही शहरांतून दिसून येत आहे. मुंबईसह अमरावती, अकोला या शहरात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे तेथील प्रशासकीय तसेच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात देखील काहीशी अशीच भीती व्यक्त करणारी परिस्थिती आहे.

- दीड महिन्यात १० हजार चाचण्या

जानेवारी २०२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ४१० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात १७७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. म्हणजे दीड महिन्यात ५८७ नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्यांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लॅब तसेच खासगी लॅब मिळून १० हजार ६५३ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या कराव्या लागल्या आहेत.

- आगीच्या भडक्यासारखा संसर्गाचा वेग

आगीचा भडका उडावा, तितक्या वेगाने कोरोना संसर्गाचा वेग आहे. एक व्यक्ती कमीत कमी चार ते आठ व्यक्तींना बाधित करू शकते, तर किमान १० ते १५ व्यक्तींच्या चाचण्या कराव्या लागतात. तीन ते चार पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढील काळात या संसर्गाचा वेग रोखण्याचे काम प्रामुख्याने नागरिकांना करायचे आहे.

पाईंटर-

- सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा.

- दोन व्यक्तींमध्ये शारीरीक अंतर राखा.

- घराबाहेर पडताच मास्कचा वापर करा.

- वारंवार हात साबणाने धुवा.

- शिंकताना, खोकताना नाका-तोंडाला रुमाल लावा.

-निष्काळजीपणा वाढलाय-

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. भाजी मंडई, महाविद्यालय, मंदिर परिसरात गर्दी होताना पाहायला मिळत आहे. परंतु नागरिकांकडून मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शारीरिक अंतराचे भानही आता ठेवले जात नाही. हा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Caution ... Corona is raising her head again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.