Kolhapur: घराघरांतील मांजरे ‘पॅन ल्युकेपेनिया’च्या सावटाखाली, उपचारासाठी पशुवैद्यकांकडे वाढली गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 18:58 IST2025-09-01T18:57:48+5:302025-09-01T18:58:14+5:30

जीवघेणा आजार 

Cats are susceptible to feline panleukopenia disease | Kolhapur: घराघरांतील मांजरे ‘पॅन ल्युकेपेनिया’च्या सावटाखाली, उपचारासाठी पशुवैद्यकांकडे वाढली गर्दी

संग्रहित छाया

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून घराघरांतील अनेक मांजरांना एक आजार होत असून, अशी अनेक मांजरे शासकीय तसेच खासगी पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचाराला येत आहेत. उपचाराला घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली असून, उपचाराकडे दुर्लक्ष केले तर त्या मांजरांचा जीव जातो अशी स्थिती आहे, या मांजरांना 'फेलाइन पॅन ल्युकेपेनिया' आजार होत असल्याचे कोल्हापुरातील शासकीय पशु वैद्यकीय रुग्णालयाचे पर्यवेक्षक डॉ. सॅम लुड्रीक यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून हा आजार मांजरांना होत असल्याची माहिती डॉ. सॅम लुड्रीक आणि खासगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी दिली. डॉक्टरांनी तपासणी केली असता आणि याबाबत काही लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर हा आजार 'फेलाइन पॅन ल्युकेपेनिया' असल्याचे निदान त्यांनी केले आहे. एका प्रकरणात मांजराने पहिल्या दिवशी उलटी केली, बाहेर काहीतरी खाल्ले असेल म्हणून मालकाने थोडे दुर्लक्ष केले, परंतु यामुळे मांजराला जीव गमवावा लागला.

घराघरांतील अनेक मांजरांना असा आजार होत असून अशी मांजरे मंगळवार पेठेतील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचाराला येत आहेत, अशी माहिती पशु पर्यवेक्षक डॉ. सॅम लुड्रीक यांनी दिली. या आजारात मांजराच्या अंगातील पाणी कमी होणे, मांजर अशक्त होणे, रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होणे, त्याचा यकृत आणि किडनीवर परिणाम होणे अशी लक्षणे आहेत.

असा आहे पॅन ल्युकेपेनिया आजार

  • मांजरांना फेलाइन पॅन ल्युकेपेनिया आणि पॅरोटोनायटीस आजार असे आजार होतात.
  • मांजराच्या छातीत, पोटात पाणी कमी होते, श्वासोच्छ्वास मंदावतो, त्रास होतो
  • डोळ्यांतून सतत पाणी येणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात.


हे आहेत उपाय

  • मांजरांना रोगप्रतिबंधक लस द्यावी.
  • जंताचे औषध नियमित द्यावे.
  • योग्य आहार द्यावा.
  • इतर मांजरांना संपर्कात येऊ देऊ नये.
  • उलटी झाल्यास त्वरित रुग्णालयात न्यावे.
  • रेबीस प्रतिबंधक लसीकरण करावे.

मांजरापासून माणसांना रोग होत नाही; परंतु एका मांजराचा दुसऱ्या मांजरास संसर्ग नक्की होतो. मांजराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यास ते या आजारातून बचावते. -डॉ. सॅम लुड्रीक, पशु पर्यवेक्षक, शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय
 

वेळीच उपचार न झाल्यास मांजरांना कावीळ होते आणि त्यातच मांजर दगावण्याची शक्यता वाढते. -डॉ. संतोष वाळवेकर, पशुवैद्यकीय अधिकारी

Web Title: Cats are susceptible to feline panleukopenia disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.