हा घ्या स्क्रीन शॉट; कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांना टक्केवारीनुसार रोख रकमा दिल्या, ठेकेदाराचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 11:43 IST2025-07-26T11:42:49+5:302025-07-26T11:43:20+5:30
मुख्यमंत्र्यांसह प्रशासकांकडेही केला तक्रारीचा मेल

हा घ्या स्क्रीन शॉट; कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांना टक्केवारीनुसार रोख रकमा दिल्या, ठेकेदाराचा आरोप
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल यांना एक टक्क्याप्रमाणे ६० हजार, शहर अभियंता नेत्रदीप यांना दोन टक्क्याप्रमाणे एक लाख २० हजार, कनिष्ठ अभियंता प्रज्ञा यांना एक लाख २० हजार, उपशहर अभियंता कांबळे ६० हजार, लेखापरीक्षक कलावती यांना रोख ३० हजार रुपये महापालिकेत दिल्याचा खळबळजनक आरोप ठेकेदार श्रीप्रसाद संजय वराळे (रा. घर नंबर ७००, आंबेडकरनगर, कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी शुक्रवारी केला. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी स्वत:हून वृत्तपत्रांच्या कार्यालयात येऊन दिले. शिवाय याच पत्राचा मेल मुख्यमंत्र्यांसह महापालिकेच्या प्रशासक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे, पोलिस अधीक्षकांना केल्याची माहिती वराळे यांनी दिली.
वराळे यांनी कसबा बावड्यातील ड्रेनेजचे काम न करता ८५ लाख रुपयांची बिले उचलल्याचा आरोप शिंदेसेनेचे नेते माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. त्यास वराळे यांनी लेखापुराव्यासह प्रत्त्युतर दिले आहे.
वाचा- ८५ लाखांच्या बिलांवरील सह्या महापालिका अधिकाऱ्यांच्याच, ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांचा दावा
वराळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत होणाऱ्या प्रभाग क्रमांक दोन कसबा बावडा पूर्व बाजू अंतर्गत जाधव घर ते बडबडे मळा ड्रेनेज पाइपलाइनच्या कामातील पाचवे रनिंग बिल ८५ लाख रुपये घेतल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला आहे. परंतु या बिलाची रक्कम जीएसटी सोबत ७२ लाख १६ हजार ३९६ इतकी होती. ती माझ्या महापालिकेमधील नोंदणीकृत युनियन बँक चालू खाते क्रमांक ४७११०१०१०२८०३३७ या खात्यावर २४ डिसेंबर २०२४ला सायंकाळी ४ वाजून ३९ मिनिटे ६ सेकंद या वेळेस महापालिकेच्या खात्यावरून ६७ लाख ५८ हजार ३ रुपये माझ्या खात्यावर जमा झाले. या कामाचे बिल मिळण्याकरिता महापालिकेतील कनिष्ठ अभियंता प्रज्ञा यांना २ टक्क्याप्रमाणे १ लाख २० हजार, उपशहर अभियंता कांबळे यांना एक टक्क्याप्रमाणे ६० हजार रोख, शहर अभियंता नेत्रदीप यांना शासन अनुदान असल्यामुळे दोन टक्क्याप्रमाणे १ लाख २० हजार रोख महापालिकेत दिले.
अकाउंट विभागातील क्लार्क नाईक, अधीक्षक सूर्यवंशी यांना प्रत्येकी लाखाला शंभर याप्रमाणे प्रत्येकी ६ हजार बिलावर सही करताना दिले. ऑडिट विभागातील क्लार्कला लाखाला शंभर, लेखापरीक्षक परीट यांना लाखाला दोनशे व मुख्य लेखा परीक्षक कलावती यांना लाखाला दोनशेप्रमाणे एकूण ३० हजार रुपये प्रत्येक सही करताना त्यांच्या विभागांमध्ये दिले. अतिरिक्त आयुक्त राहुल यांना एक टक्क्याप्रमाणे ६० हजार रुपये दिले. हे बिल शासन नियमानुसारच मिळाले आहे, त्यामध्ये कोणताही घोटाळा केला नसल्याचा दावा वराळे यांनी केला आहे.
ठेकेदार म्हणतो, ‘हा घ्या पैसे दिल्याचा स्क्रीन शॉट..!’
आपण महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता प्रज्ञा यांना ८० हजार रुपये गुगल-पे केले होते, असे ठेकेदार वराळे यांनी सांगितले. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी गुगल-पे खात्याचा स्क्रीन शॉटही उपलब्ध करून दिला.
इतिहासात प्रथमच..
महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल आजपर्यंत कायमच चर्चा होत राहिली; परंतु एखाद्या ठेकेदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांना टक्केवारीनुसार लाच दिल्याचा लेखी आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशा स्वरूपाचे आरोप झाल्यामुळे लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. निवडणूक तोंडावर असताना झालेले हे आरोप अनेकांना चांगलेच शेकणार आहेत.