कोल्हापुरात पुराच्या पाण्यात कार घातली.. मध्येच अडकल्यावर चालकाची भंबेरी उडाली -video
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:29 IST2025-06-27T12:28:47+5:302025-06-27T12:29:08+5:30
तत्काळ महापालिका अग्निशमन विभागाचे पथक जाऊन कारसह चालकास सुखरूपपणे बाहेर काढले

कोल्हापुरात पुराच्या पाण्यात कार घातली.. मध्येच अडकल्यावर चालकाची भंबेरी उडाली -video
कोल्हापूर : शिंगणापूर-हणमंतवाडी रस्त्यावरील ओढ्यावरील पुलावर पंचगंगा नदीचे आलेल्या पुराच्या पाण्यात गुरुवारी धाडसाने चालकाने कार घुसवली. पुलाच्या मध्यभागी गेल्यानंतर कार निम्मी पाण्यात बुडाली. कारमध्ये पाणी येऊ लागल्यानंतर चालकाची भंबेरी उडाली. तत्काळ महापालिका अग्निशमन विभागाचे पथक जाऊन कारसह चालकास सुखरूपपणे बाहेर काढले.
दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने ओढे, नाले भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. यामुळे शिंगणापूर-हणमंतवाडी रस्त्यावरील ओढ्याच्या पुलावर पाणी आले आहे. यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. तरीही कोल्हापूरहून हणमंतवाडीकडे निघालेले अनिकेत पंडत यांनी गुरुवारी सकाळी कार पुराच्या पाण्यात घातली.
सुरुवातीला पाणी कमी होते. पण, पुलाच्या मध्यभागी गेल्यानंतर कार निम्मी बुडाली. चालक पंडत आपला बचाव करून घेण्यासाठी कारमधून बाहेर आले. ही घटना कळताच महापालिका अग्निशमन विभागाचे पथक बचावासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चालकास सुखरूपपणे बाहेर काढले.