Kolhapur Municipal Election 2026: प्रचाराचे नारळ फुटले.. उमेदवारांना मतदाराचे घर आठवले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 17:51 IST2025-12-18T17:49:48+5:302025-12-18T17:51:16+5:30
ऐन थंडीत महापालिका निवडणूक वातावरण तापण्यास सुरुवात

Kolhapur Municipal Election 2026: प्रचाराचे नारळ फुटले.. उमेदवारांना मतदाराचे घर आठवले!
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक सोमवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला मिळणारा कमी कालावधी लक्षात घेऊन उमेदवारांनी आता प्रचाराचे नारळ फोडून थेट मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांचे नारळ कधी फुटायचे ते फूट देत, आपण कामाला लागलेले बरे असं म्हणत अनेक प्रभागात पन्नास-शंभर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दादा, मामा, काका, काकी, असं म्हणत मतदारांची दारे ठोठावली जाऊ लागली आहेत.
महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभागरचना जाहीर झाल्यापासून इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. परंतु काही अपवादवगळता उमेदवार थेट घरापर्यंत जात नव्हते. सोमवारी निवडणूक जाहीर झाली आणि प्रचाराला मिळणारा कमी कालावधी लक्षात घेऊन उमेदवार आता पळायला लागले आहेत.
अनेक उमेदवारांनी आपली उमेदवारी डिजिटल फलक, वाढदिवसांचे कार्यक्रमाद्वारे जाहीर केली आहे. प्रभागात लागलेले डिजिटल हा आचारसंहिता पूर्व प्रचारचाच भाग होता. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले होते. आचारसंहिता लागू झाली तसे डिजिटल फलक गायब झाले. सोमवारी दुपारी निवडणूक जाहीर झाली, आचारसंहिता लागू झाली आणि त्याच रात्री इच्छुक उमेदवारांनी जाहीर प्रचाराला सुरुवात केली. सायंकाळी काही प्रभागात उमेदवारांकडून प्रचार पदयात्राही काढण्यात आल्या.
राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही आपणाला नेत्यांनी शब्द दिला असून, उमेदवारी मिळणार असे गृहीत धरूनच पक्षीय चिन्ह असलेले पॉम्पलेट वाटप सुरू केले आहे. उमेदवारांनी आपली संपर्क कार्यालये सुरू केली आहेत, काही इच्छुक उमेदवार प्रचार कार्यालयासाठी जागेची पाहणी करत आहेत. काही वर्षांपूर्वी उमेदवाराचे घर हेच प्रचार कार्यालय असायचे; परंतु आता या निवडणुकीत उमेदवारांनी स्वतंत्र प्रचार कार्यालय सुरू करण्याचा कल वाढला आहे.
इच्छुक उमेदवार आता मतदारांच्या घरापर्यंत थेट प्रचार करताना दिसत आहेत. सकाळी वैयक्तिक गाठीभेटी घेऊन सायंकाळच्या वेळी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार पदयात्रा काढल्या जात आहेत. गळ्यात पक्षाचे स्कार्प घातलेले कार्यकर्ते रस्त्यावरून प्रचार करत फिरताना दिसत आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण निवडणूकमय झाले आहे.
सोशल मीडियाचा मोठा वापर
सोशल मीडियाचा प्रसार जोरात झाल्याने प्रचारासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हेच महत्त्वाचे साधन असल्याने उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी केला जाऊ लागला आहे. उमेदवारांनी मिम्स, व्हिडीओ तयार करून ते प्रभागातील मतदारांच्या फोनवर सोडण्यास सुरुवात केली आहे.