Kolhapur: इचलकरंजीत महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार भागात सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:33 IST2025-12-17T15:33:21+5:302025-12-17T15:33:51+5:30
महाविकास एकत्र ; महायुतीची अद्याप चर्चा

Kolhapur: इचलकरंजीत महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार भागात सक्रिय
अतुल आंबी
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूक जवळ आल्याने उमेदवारांसह नेतेमंडळींच्या तयारीला जोर लागला आहे. प्रथमदर्शनी महायुती विरूद्ध महाविकास अशीच लढत होण्याचे संकेत दिसत आहेत. दोन्हींकडील इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक झाल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. सर्वच इच्छुक आपापल्या भागात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे बंडखोरीची भीती वाढत आहे.
इचलकरंजी नगरपालिकेची महापालिका झाल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह नवखेही इच्छुक आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राबलेल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थान देण्यासाठी नेत्यांनी सुरूवातीला भेटेल त्याला भागात कामाला लाग, असे सांगितले. त्यामुळे सर्वच इच्छुक भागातील किरकोळ वाढदिवसापासून ते सर्व कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थित राहण्यासह भेटवस्तू, मदत करत आहेत.
दुसऱ्या टप्प्यात उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना चाचपणी (सर्व्हे) करून निर्णय घेतला जाईल, असे सांगत गॅसवर ठेवले आहे. आता शेवटच्या टप्प्यात निवडून येण्याची क्षमता असणाºयांना उमेदवारी दिली जाईल. तसेच अन्य इच्छुकांना शासनाच्या विविध पदांवर आणि स्वीकृत सदस्यपदी संधी दिली जाईल. कोणालाही नाराज केले जाणार नाही, असे सांगितले जात आहे. नाराजी आणि बंडखोरी रोखण्याचा हा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे. भाजपकडून ६५ जागांसाठी सुमारे ३०० जणांनी, तर महाविकास आघाडीकडून १९२ जणांनी अर्ज नेले आहेत.
प्रलंबित मुलभूत प्रश्न
- शुद्ध व मुबलक पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर सुळकूड योजना प्रलंबित.
- कृष्णा योजनेची गळती नित्याचीच.
- शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय.
- भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जटील
- कचरा उठाव आणि डेपो कामात सुसूत्रता नाही.
- शहरात सर्वत्र अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर
- वाहतूक शाखेसोबत समन्वय नसल्याने वाहतुकीच्या अडचणी.
- फूटपाथांची दुरवस्था.
- पेयजल प्रकल्पांची दुरवस्था.
- कूपनलिकांमुळे सर्वत्र चाळण.
- महापालिका झाल्यानंतरही प्रश्न ‘जैसे थे’
- अधिकारी आणि सिक्युरिटी गार्ड यांचीच संख्या वाढली.
महाविकास एकत्र ; महायुतीची अद्याप चर्चा
महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षांनी एकत्रित लढण्याबाबत निर्णय घेतला असून, त्यानुसार कामकाज सुरू झाले आहे. तर महायुतीमधील घटक पक्ष असणाºया शिंदेसेना आणि अजित पवार गटासोबत अद्याप चर्चेचे गुºहाळे सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून वेट अॅण्ड वॉच सुरू आहे.
महायुतीसाठी नियोजन करणार
महापालिका निवडणुकीसंदर्भात घटक पक्षांसोबत चर्चा करून योग्य नियोजन करून मतभेद टाळले जातील, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चर्चेचे सर्व दरवाजे खुले ; आवळे
महापालिका निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवर आणि व्यक्तींवर लढवली जाते. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांना चर्चेसाठी आम्ही सर्व दरवाजे खुले ठेवले आहे. कोणत्याही अन्य पक्षांतून येणाऱ्यांचेही आम्ही स्वागत करू, असे माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी सांगितले. त्यामुळे अन्य पक्षांकडून नाराज झालेल्यांना महाविकासचा पर्याय उपलब्ध असल्याचे संकेत त्यांनी दिले.
वेळेत उमेदवारी आवश्यक
इच्छुक उमेदवार प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासह भागात संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित होण्याआधीच पक्षाकडून उमेदवारी निश्चित करणे आवश्यक आहे; अन्यथा वेळ पुढे गेल्यास कार्यकर्त्यांना रोखणे अडचणीचे ठरणारे आहे.