‘इतक्यात वर पाठवता का?; शरद पवारांची फिरकी अन् हसून वळली मुरकुंडी, नेमकं काय घडलं.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:24 IST2025-09-18T12:23:26+5:302025-09-18T12:24:02+5:30
आर. के. पोवार यांच्या सूचनेवर टोलेबाजी

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : ‘साहेब आता कोणाला भेटणार नाहीत, ते आता वरती (हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर) विश्रांतीला जाणार, असे आपल्या खास शैलीत उपस्थितांना पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी सांगितले. यावर, क्षणाचाही विलंब न करता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘आर. के.’ यांचीच फिरकी घेत वरती म्हणजे हॉटेलमध्येच ना? ‘इतक्यात वर पाठवता का?’ असे म्हणताच पवार यांच्यासह उपस्थितांना हसू आवरेना.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार हे बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात आले. शहरातील एका हॉटेलमध्ये आल्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पवार प्रवास करून आल्याने ते आता कोणाला भेटणार नाहीत, मीडियाशी आज, गुरुवारी सकाळीच बोलतील.
आता, ते वरती विश्रांतीला जाणार असल्याचे आर. के. पोवार यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये उपस्थितांना सांगितले; पण यावर वरती म्हणजे हॉटेलमध्येच ना? असे पवार म्हणताच ‘आर. के.’ यांनी हात जोडत स्वताच्याच गालावर मारत ‘साहेब, तसे नाही ओ’ असे म्हटल्यानंतर एकच हशा पिकला. यावेळी, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, सुनील देसाई, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते.
पन्हाळ्यावर आज साखर कामगारांचे शिबिर
पन्हाळ्यावर आज, गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता राज्यातील साखर कामगारांच्या शिबिरास खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत.