मुश्रीफ यांना कॅबिनेट निश्चित; सतेज, ‘पी. एन.’ यांना संधी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:43 AM2019-11-27T11:43:19+5:302019-11-27T11:44:39+5:30

एकूणच रविवारी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन त्यानंतर दोन-तीन दिवसांत उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

Cabinet fixed for Musharraf; Satej, 'P. N. ' | मुश्रीफ यांना कॅबिनेट निश्चित; सतेज, ‘पी. एन.’ यांना संधी शक्य

मुश्रीफ यांना कॅबिनेट निश्चित; सतेज, ‘पी. एन.’ यांना संधी शक्य

Next
ठळक मुद्देकॅबिनेटसाठी त्यांचा आग्रह राहील; पण कॉँग्रेसच्या वाटणीला किती कॅबिनेट येतात, त्यावरच

कोल्हापूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी (दि. १) सायंकाळी शपथ घेणार आहेत. ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कोल्हापुरातून कोणाकोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता लागली आहे. राष्टÑवादीमधील अंतर्गत हालचाली पाहता आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार हे निश्चित आहे. कॉँग्रेसमधून आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस यांची आघाडी आकारास आल्यानंतर जिल्ह्यात कोणाकोणाला संधी मिळणार याविषयी चर्चा सुरू होती. मंत्रिपदांची तीन पक्षांत वाटणी होणार असल्याने पक्षांतर्गत वाटप करताना पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये दिग्गज नेते असले तरी हसन मुश्रीफ यांना संधी मिळणार हे निश्चित आहे. अजित पवार यांच्या बंडापूर्वी मुश्रीफ यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाले होते. यावरून मुश्रीफ यांचे पक्षातील वजन अधोरेखीत होते. त्यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाबरोबरच वजनदार खातेही मिळणार हे निश्चित आहे.

कॉँग्रेसच्या वाटणीला साधारणत: १२ मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. प्रादेशिक समतोल आणि इतर बाबींचा विचार करूनच मंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे. कोल्हापुरातून कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली चार आमदार निवडून आल्याने मंत्रिपदावर त्यांचा दावा राहू शकतो. कॅबिनेटसाठी त्यांचा आग्रह राहील; पण कॉँग्रेसच्या वाटणीला किती कॅबिनेट येतात, त्यावरच अवलंबून राहणार आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांचाही मंत्रिमंडळात समावेश करावा, यासाठी ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन मागणी केली. पक्षनिष्ठा आणि ज्येष्ठत्व पाहता पाटील यांना संधी द्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांची आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या समर्थकांनीही मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

 

Web Title: Cabinet fixed for Musharraf; Satej, 'P. N. '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.