चांदोलीत टेरेस चॅनेलला भगदाड ; प्रकल्पाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:21 IST2021-01-22T04:21:44+5:302021-01-22T04:21:44+5:30
सतीश नांगरे, लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारुण : चांदोली जलविद्युत प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे येथील टेरेस चॅनेलला भगदाड पडले आहे. ...

चांदोलीत टेरेस चॅनेलला भगदाड ; प्रकल्पाला धोका
सतीश नांगरे,
लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारुण : चांदोली जलविद्युत प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे येथील टेरेस चॅनेलला भगदाड पडले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ही स्थिती आहे. त्यामुळे पडलेले भगदाड दिवसेंदिवस वाढू लागले आहे.
सुरुवातीला याची दुरुस्ती महाजनकोने करायची, की धरण प्रशासन यांनी करायची, या दुविधेत पाच वर्षे निघून गेलीत. त्यामुळे पडलेले भगदाडही दिवसेंदिवस वाढत गेले. या भागाची दुरुस्ती वेळेत झाली नाही, तर भविष्यात जलविद्युत प्रकल्पाला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चांदोली येथे सोळा मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. या प्रकल्पातून वीज निर्मिती होऊन गतीने बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे येथील टेरेस चॅनेलला भगदाड पडले. सुरुवातीला हे भगदाड छोटे होते. खरे तर त्याचवेळी तात्काळ याची दुरुस्ती व्हायला हवी होती. मात्र दुरुस्ती कोणी करायची, तसेच शासनाकडून देखभाल-दुरुस्तीसाठी निधी नाही, हे कारण पुढे करत गेल्या पाच-सहा वर्षांपासून या घटनेकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे दिवसेंदिवस या भगदाडात वाढ होत जाऊन सध्या हे भगदाड भलेमोठे झाले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांच्या मते या भगदाडामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नाही, ही वस्तुस्थिती असली तरी, याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे भविष्यात धोका निर्माण करण्यासारखेच आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ या टेरेस चॅनेलची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
फोटोः
चांदोली येथील जलविद्युत प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे येथील टेरेस चॅनेलला असे भलेमोठे भगदाड पडले आहे. ( छाया : सतीश नांगरे )