मालवाहू कंटेनरचा ब्रेक फेल, वाकरे फाट्यानजीक तिहेरी अपघात; सुदैवाने जिवीतहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:32 IST2022-04-06T19:32:08+5:302022-04-06T19:32:28+5:30
कोपार्डे - मालवाहू कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने समोरून येणाऱ्या ट्रँक्टर ट्रॉलीला जोराची धडक दिली. यात ट्रॉली पलटी होऊन रस्त्याच्या ...

मालवाहू कंटेनरचा ब्रेक फेल, वाकरे फाट्यानजीक तिहेरी अपघात; सुदैवाने जिवीतहानी नाही
कोपार्डे - मालवाहू कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने समोरून येणाऱ्या ट्रँक्टर ट्रॉलीला जोराची धडक दिली. यात ट्रॉली पलटी होऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोटरसायकलवर कोसळल्याने मोटरसायकलचा चक्काचूर झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर वाकरे फाट्याच्या पुर्वेला उतारावर हा तिहेरी अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वारणा कोडोली येथील उदय निकम यांच्या मालकीचा मालवाहतूक करणारा कंटेनर (क्र. एम एच.०८-एच -२३५२) हा तळकोकणातून माल घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर वाकरे फाट्याच्या पुर्वेला तीव्र उतारावर कंटेनरचा ब्रेक निकामी झाला.
यावेळी चालक उपेंद्र कुमार याने भांबावून गेल्याने विरुद्ध दिशेने कोल्हापूरहून धुंदवडे कडे जाणाऱ्या ट्रँक्टर-ट्रॉलीला (क्र.एम.एच १२ डी-१२०७) ला धडक दिली. यात ट्रॉली उलटून रस्त्याच्या शेजारी लावण्यात आलेल्या साबळेवाडी (ता. करवीर) येथील वैभव केरबा गडकरी यांच्या मोटरसायकलवर उलटली. यात मोटर सायकलचा चक्काचूरा झाला. तर ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रँक्टर चालक सतीश कृष्णात कांबळे हा किरकोळ जखमी झाला आहे.
अपघातानंतर कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरची वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.