Kolhapur: महापुरात वाहून गेलेल्या मृतदेहाचे अवशेष चार महिन्यांनी सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:25 IST2024-12-25T13:23:13+5:302024-12-25T13:25:04+5:30
कुरुंदवाड / दत्तवाड (जि. कोल्हापूर ) : ऑगस्टमध्ये महापुरात वाहून गेलेले अकिवाट (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ...

Kolhapur: महापुरात वाहून गेलेल्या मृतदेहाचे अवशेष चार महिन्यांनी सापडले
कुरुंदवाड / दत्तवाड (जि. कोल्हापूर) : ऑगस्टमध्ये महापुरात वाहून गेलेले अकिवाट (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरागदार यांच्या हाडांचा सापळा तब्बल चार महिन्यांनी इंगळी (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथील कृष्णा नदीकाठावरील उसाच्या शेतीमध्ये सापडला. अंगावरील कपडे, सुपारीचा डबा आणि मोबाइलच्या पिशवीवरून तो बारगीर यांचाच सापळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अवशेष नातेवाइकांच्या ताब्यात दिले.
कृष्णा नदीला २ ऑगस्ट रोजी आलेल्या महापुरात अकिवाटहून बस्तवाडकडे गावचा नळ पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी बैरागदार यांच्यासह सातजण ट्रॅक्टर-ट्रॉलीत बसून जात होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर गावालगत असलेल्या ओढ्यात उलटला होता. यावेळी बैरागदार, सरपंचांचे पती सुहास पाटील, अण्णासाहेब हसुरे यांच्यासह सातजण बुडाले होते. चौघांना सुखरूप बाहेर काढले, तर पाटील, हसुरे यांचा मृतदेह सापडला होता. मात्र, बैरागदार यांचा मृतदेह सापडत नसल्याने शासकीय यंत्रणेने शोधमोहीम थांबविली होती.