कालव्यात बुडालेल्या शाळकरी मुलाचा मृतदेह लागला हाती, कोल्हापूर जिल्ह्यातील सरवडे येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 15:42 IST2022-12-26T15:42:28+5:302022-12-26T15:42:51+5:30
कालव्याला पाणी जास्त असल्यामुळे शोध घेणे अवघड बनले. त्यानंतर धरण अधिकार्यांना कळवून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले.

कालव्यात बुडालेल्या शाळकरी मुलाचा मृतदेह लागला हाती, कोल्हापूर जिल्ह्यातील सरवडे येथील घटना
दता लोकरे
सरवडे : काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात बुडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. संदिप संजय सुतार (वय १४) असे या मृत मुलाचे नाव आहे. हि घटना काल, रविवारी दुपारी सरवडे -उंदरवाडी गावच्या हद्दीतील कालव्यात घडली. त्याचा मृतदेह आज सोमवारी पहाटे आढळून आला.
संदिप हा फोंडा गावचा असून सरवडे येथे निवृती सुतार यांच्याकडे आजोळी राहत होता. तो येथील शिवाजीराव खोराटे विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकत होता. काल रविवारी सुट्टी असल्याने तो मित्रांसमवेत डोंगराच्या भैरीला दर्शनासाठी गेला होता. मित्रांनी मिळून जेवण देखील केले होते. जेवल्यानंतर परत येत असताना दुधगंगा उजव्या कालव्यात तो अंघोळीसाठी उतरला त्याला पोहता येत नसल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जावून तो बुडाला.
तो बुडाल्याचे मित्रांच्या लक्षात आल्यानंतर सर्वांनी गावाकडे धाव घेतली व नातेवाईकांना कल्पना दिली. नातेवाईक व गावातील युवकांनी तात्काळ धाव घेऊन त्याचा कालव्यात शोध घेतला परंतु आढळला नाही. कालव्याला पाणी जास्त असल्यामुळे शोध घेणे अवघड बनले. त्यानंतर धरण अधिकार्यांना कळवून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले.
कालव्यातील पाणी पूर्ण बंद झाल्यानंतर आज पहाटे त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात उतरीय तपासणी करण्यात आली. सरवडे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.