कोल्हापुरी चपलेमध्ये प्रथमच ब्लॉकचेन तंत्रज्ञान, जगभरातील पहिलाच प्रयोग; आमिर खानकडून कौतुक

By संदीप आडनाईक | Published: March 4, 2024 03:39 PM2024-03-04T15:39:38+5:302024-03-04T15:41:07+5:30

कारागीर, ग्राहकाचे नाव समाविष्ट; काय आहे ब्लॉकचेन तंत्रज्ञान

Blockchain technology for the first time in Kolhapuri chapal, world first experiment | कोल्हापुरी चपलेमध्ये प्रथमच ब्लॉकचेन तंत्रज्ञान, जगभरातील पहिलाच प्रयोग; आमिर खानकडून कौतुक

कोल्हापुरी चपलेमध्ये प्रथमच ब्लॉकचेन तंत्रज्ञान, जगभरातील पहिलाच प्रयोग; आमिर खानकडून कौतुक

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पारंपरिक रुबाबाचं प्रतीक असलेल्या जगप्रसिद्ध कोल्हापुरी चपलेला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड मिळालेली आहे. अस्सल आणि टिकाऊ कोल्हापुरी चप्पल ग्राहकांना मिळावे यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) सुवर्णजयंती वर्षानिमित्त ‘ब्लॉकचेन’ या अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित नवीन चपला विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या 'क्यूआर’कोडचे अनावरण करण्यात आले. त्यातील एनएफसी टॅग एम्बेडमुळे बनावट चप्पलांच्या विक्रीला आळा बसणार आहे. चपलांमध्ये अशाप्रकारे जगात प्रथमच तंत्रज्ञान वापरले गेले आहे.

कोल्हापुरी चप्पला बनवण्यासाठी कोल्हापुरातीलच कारागीरांची खास ओळख आहे. सत्यासाठी कारागीराला अनेक दिवसांची मेहनत करावी लागते. यासाठी लागणारे कातडे खास कमावलेले असते. त्यामुळेच जगभरात या चप्पला नावाजलेल्या आहेत. कोल्हापूरसह सीमाभागात बेळगाव, कर्नाटकातून या कोल्हापुरी चपला विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे बनावट चपलाही विकल्या जाऊन ग्राहकांची फसवणूक होते; परंतु ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे एका क्लिकद्वारे ग्राहकांना या कोल्हापुरी चप्पलेची विश्वासार्हता समजणार आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.

काय आहे ब्लॉकचेन तंत्रज्ञान

ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान २००८ मध्ये सर्वप्रथम क्रिप्टो करन्सी, बिटक्वाईनसाठी वापरले गेले. विश्वासार्हता आणि पारदर्शकता यामुळे या तंत्रज्ञानात कोणतेही फेरबदल करता येत नाहीत. गौरव सोमवंशी यांनी एमरटेक इनोव्हेशन्सच्या स्टार्टअपमधून एका ॲप्लिकेशनमधून जगभरातील हा पहिलाच प्रयोग कोल्हापुरी चप्पलेसाठी केला. चपलेच्या आत एक छोटी चीप बसवली आहे. चप्पल मोबाईलने स्कॅन करताच ती कुठे बनली, त्याच्या कारागिराचे नाव, चपलेला लागणारे चामडे कुठून आणले, ते कोणत्या प्राण्याचे आहे, याची माहिती ग्राहकांना मिळते. या तंत्रज्ञानामध्ये वस्तूचा इतिहास, त्याच्या उत्पादनाची प्रक्रिया यापासून ते विक्रीपर्यत प्रत्येक गोष्टीची माहिती मिळेल शिवाय एका क्लिकवर कोल्हापुरी चप्पल असली की नकली, हेही ओळखता येणार आहे. सुभाषनगर येथील कारखान्यात या चप्पला तयार होत आहेत, अशी माहिती संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापक अमोल शिंदे यांनी दिली.

ग्राहकाचे नाव चक्क चीपमध्ये

वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकाने चप्पल विकत घेतल्यानंतर एनएफसी टॅग एम्बेड करून संगणकाच्या आधारे संबंधित ग्राहकाचे नावही ट्रेसमध्ये जोडण्यात येते. त्यात बदल करता येत नाही.

आमिर खानकडून कौतुक

पाणी फाउंडेशनने पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवर २९ फेब्रुवारीला आयोजित कार्यक्रमात गौरव सोमवंशी यांनी अभिनेता आमिर खान यांना क्यूआर कोडसह टॅग केलेले आणि त्यात एनएफसी टॅग एम्बेड केलेल्या कोल्हापुरी चप्पलेची माहिती दिली. त्यांना भेट दिलेल्या कोल्हापुरी चप्पलेच्या ट्रेसमध्ये त्यांचे नावदेखील जोडले. लिडकॉमच्या या नावीन्यपूर्ण प्रकल्पाचे आमीरने भरभरून कौतुक केले.

  • कोल्हापुरी नावाची नोंदणी
  • जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग (४ मे २००९)
  • नोंदणीकृत मालमत्ता : लिडकॉमची अधिकृत नोंदणीकृत मालमत्ता
  • जगभरात प्रथमच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर
  • क्यू आर कोड 
  • एनएफसी टॅग एम्बेड

Web Title: Blockchain technology for the first time in Kolhapuri chapal, world first experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.