Kolhapur Politics: ‘झेडपी’साठी शक्ती सारी, भाजपची विधानसभेची तयारी
By विश्वास पाटील | Updated: July 19, 2025 17:02 IST2025-07-19T17:01:45+5:302025-07-19T17:02:44+5:30
निवडणुका लांब असल्या तरी मोर्चेबांधणी सुरू : हाताला लागेल तो कार्यकर्ता घ्या पक्षात

Kolhapur Politics: ‘झेडपी’साठी शक्ती सारी, भाजपची विधानसभेची तयारी
विश्वास पाटील
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी म्हणून भाजप हाताला लागेल त्या नेत्याला पक्षात सढळ हाताने प्रवेश देत असले तरी त्यामागे २०२९ च्या विधानसभेची पेरणी सुरू आहे. या निवडणुकीला अजून चार वर्षांचा अवधी असला तरी भाजप हा बारा महिने, चोवीस तास सर्वच निवडणुकांची तयारी करत असतो. पक्षाचे केंद्रीय नेते व गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी विधानसभा भाजप स्वबळावर लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे त्याची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरु आहे.
- जिल्ह्यातील विधानसभेच्या दहापैकी तीन आमदार पक्षाचे आहेत. उर्वरित सात जागांपैकी करवीर व राधानगरी मतदारसंघात पक्षाची ताकद कमी आहे. राज्यात व केंद्रातही पक्षाची सत्ता आली, राजकीय ताकद वाढली तरी भाजपने मागच्या दहा वर्षांत दुसऱ्या पक्षातील तयार नेते घेऊन पक्ष बळकट करण्यावरच भर दिला आहे. या दोन्ही तालुक्यांत तसे तयार नेतेही कुणी हाताशी न लागल्याने पक्ष तिथे कमकुवत आहे.
- करवीरमध्ये मध्यंतरी काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्यावर फासे टाकून बघितले; परंतु त्यांनी आपण काँग्रेसशीच एकनिष्ठ राहणार असल्याचे जाहीर केल्याने आता अभिषेक बोंद्रे आणि जनसुराज्य पक्षाचे संताजी घोरपडे यांना पक्षात घेतले आहे.
- राधानगरीत आजच्या घडीला तरी या पक्षाकडे ताकदीचा उमेदवार नाही. आगामी काळात तिथे ए. वाय. पाटील यांच्यासारखा एखादा तयार नेता पक्षात घेतला जाऊ शकतो. जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील हे तिथे पक्षासाठी धडपड करत आहेत.
- कोल्हापूर उत्तरमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीपासूनच कृष्णराज महाडिक हाकारे घालू लागले आहेत. त्यामुळे ते दावेदार असतील. भाजपच्या मुशीतला कार्यकर्ता म्हणून महेश जाधव अजून स्पर्धेत आहेत. लोकसभेला महाडिक कुटुंबातील उमेदवार रिंगणात राहिल्यास विधानसभेची गणिते बदलू शकतात.
- कागलमध्ये संजय घाटगे यांना पक्षात घेतले आहे; परंतु त्यांनी आगामी उमेदवार म्हणून अंबरीश घाटगे यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. समरजित घाटगे यांचेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध असल्याने तो एक सक्षम पर्याय भाजपपुढे आहे.
- शिरोळमधून गुरुदत्त कारखान्याचे संस्थापक माधवराव घाटगे यांचे नाव गेल्या निवडणुकीतही पुढे आले होते; परंतु त्यांनी त्यावेळी नकार दिला. आताही सावकर मादनाईक यांना भाजपमध्ये आणण्यास तेच सूत्रधार आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील त्यांचा शब्द कधीच मोडत नाहीत. त्यामुळे पक्षाने आग्रह केल्यास घाटगे हा एक पर्याय असू शकतो. त्याशिवाय पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, सावकर मादनाईक यांचाही विचार होऊ शकतो.
- आमदार विनय कोरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निकटचे संबंध आहेत. शिवाय त्यांच्यासारखा सहयोगी पक्ष सोबत हवा असल्याने शाहूवाडीतूनही भाजप पक्षीय पातळीवर फारशी ताकद लावताना दिसत नाही.
- हातकणंगलेतही आमदार अशोकराव माने हेच भाजपचे सहयोगी उमेदवार असू शकतात किंवा त्यांना थेट पक्षात प्रवेश दिला जाऊ शकतो.
मतदार संघनिहाय संभाव्य उमेदवार असे :
- कोल्हापूर उत्तर : कृष्णराज महाडिक, महेश जाधव
- कोल्हापूर दक्षिण : आमदार अमल महाडिक
- इचलकरंजी : आमदार राहुल आवाडे
- चंदगड : आमदार शिवाजी पाटील
- कागल : समरजित घाटगे, अंबरीश घाटगे
- हातकणंगले : डॉ. सुजित मिणचेकर, राजू किसन आवळे
- शिरोळ : माधवराव घाटगे, राजवर्धन निंबाळकर, सावकर मादनाईक
- शाहूवाडी : आमदार विनय कोरे (सहयोगी)
- करवीर : ताकदीचा उमेदवार नाही
- राधानगरी : ताकदीचा उमेदवार नाही
आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे मतदारसंघ वाढतील; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी भाजप विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच करीत आहे. - नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष, भाजप, कोल्हापूर