उमेदवार तुमचाच परंतु चिन्ह आमचे, कोल्हापूर लोकसभेच्या एका जागेसाठी भाजपची भूमिका
By विश्वास पाटील | Updated: February 21, 2024 14:00 IST2024-02-21T14:00:12+5:302024-02-21T14:00:42+5:30
विश्वास पाटील कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार संजय मंडलिक व हातकणंगलेतून धैर्यशील माने हेच महायुतीचे उमेदवार असतील परंतु ...

उमेदवार तुमचाच परंतु चिन्ह आमचे, कोल्हापूर लोकसभेच्या एका जागेसाठी भाजपची भूमिका
विश्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूरलोकसभा मतदारसंघातून खासदार संजय मंडलिक व हातकणंगलेतून धैर्यशील माने हेच महायुतीचे उमेदवार असतील परंतु या दोन्हीपैकी एका उमेदवारास कमळ चिन्हावर लढवावे, असा आग्रह आता भाजपकडून सुरू झाला आहे. उमेदवार तुमचा परंतु चिन्ह आमचे, अशी नवी भूमिका भाजपने घेतली असून त्यामुळे जिल्ह्यातील जागांचाही समतोल होईल, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे दोन्ही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेल्याने तेच महायुतीचे उमेदवार असतील, अशी अटकळ होती. परंतु भाजपमधूनच सर्व्हेमध्ये या दोघांबद्दल नाराजी असल्याचे चित्र उभे करण्यात आले. पक्षाने संधी दिली तर आम्ही लढायला तयार आहे, अशी भूमिका भाजपच्या नेत्यांकडून जाहीरपणे घेतली गेली.
चार दिवसांपूर्वी शिरदवाड (ता. शिरोळ) येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे यांनी धैर्यशील माने यांना बदला असे लोकच म्हणत असल्याचे जाहीर केले व मुलगा राहुल आवाडे यांचे नाव पुढे दामटले. त्यामुळे या दोघांच्या उमेदवारीबाबत अनेकदा संभ्रम तयार झाला.
परंतु जेव्हा शिवसेना दुभंगली तेव्हा सुरुवातीला मातोश्रीला सावरण्यासाठी पुढे असलेले हे दोन्ही खासदार हळूच शिंदे गटात सामील झाले. त्यावेळी उमेदवारीबाबत काहीतरी शब्द घेतल्याशिवाय त्यांनी पाठिंबा दिला नसेल हे स्पष्टच आहे. शिवाय विद्यमान खासदारांना बाजूला करून ही उमेदवारी दुसऱ्यालाच कुणाला दिली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे मंडलिक-माने यांची उमेदवारी निश्चित आहे.
जिल्ह्यातील दोन्ही जागेवर शिंदे गटाचे खासदार झाल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुणाकडे जायचे, असाही प्रश्न तयार होतो. शिवाय कोल्हापुरातून भाजप कधी लढला नसला तरी पूर्वीच्या इचलकरंजी मतदारसंघातून भाजपने दोनवेळा कमळ चिन्हांवर निवडणूक लढवली आहे. लोकसभेच्या १९९६ च्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून निवेदिता माने यांनी तब्बल दोन लाख मते घेतली परंतु याच निवडणुकीत गणपतराव सरनोबत यांनाही सव्वा लाखांवर मते मिळाली होती. तेव्हा जिल्ह्यात भाजपचे फारसे जाळे नसतानाही त्यांनी मिळवलेली मते लक्षणीय होती. पुढे १९९८ च्या निवडणुकीत निवेदिता माने शिवसेनेकडून लढून पराभूत झाल्या तरी तेव्हापासून हा मतदारसंघ मागील सहा निवडणुकीत शिवसेनेकडे गेला आहे. त्यामुळे एक मतदारसंघ भाजपच्या चिन्हावर लढवला जावा, असे त्या पक्षाला वाटते.
उमेदवार तोच ठेवून कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे. दोन्हीपैकी कोणताही एक मतदारसंघ आम्हाला द्या, असा भाजपचा आग्रह आहे. कमळ चिन्ह मिळावे यासाठी तसे दोन्ही उमेदवार देव पाण्यात घालून बसले आहेत. कारण एकदा ते चिन्ह मिळाले की निवडणुकीसाठी सगळी रसद त्या पक्षाकडून मिळते. चिन्हाचाही फायदा होऊ शकतो. परंतु यास मुख्यमंत्री शिंदे कितपत तयार होतात यावर हा निर्णय अवलंबून आहे. एकदा या जागेवरील हक्क सोडला की त्यांचा एक खासदार कायमचाच कमी झाला. त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून आणणे ही तितकीच त्यांचीही गरज आहेच.
हातकणंगले मतदारसंघातून आतापर्यंत भाजपकडून कोण लढले..?
१९९१ : सुभाष वोरा : ४० हजार : पराभूत विरुद्ध काँग्रेसचे बाळासाहेब माने
१९९६ : गणपतराव सरनोबत : १ लाख २५ हजार : पराभूत विरुद्ध काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे