Kolhapur: शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील एकत्र येणार ?; महागाव येथे बंद खोलीत भेट, सकारात्मक चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:37 IST2025-10-27T15:34:44+5:302025-10-27T15:37:06+5:30
‘चंदगड’च्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता

Kolhapur: शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील एकत्र येणार ?; महागाव येथे बंद खोलीत भेट, सकारात्मक चर्चा
राम मगदूम
गडहिंग्लज : भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील आणि काँग्रेसचे नेते, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील हे दोघेही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. शिवाभाऊ व अप्पींनी पुढील वाटचालीत एकत्र रहावे असा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवरच रविवारी (२६) दुपारी महागाव येथे बंद खोलीत दोघांची ‘सकारात्मक’ चर्चा झाल्याचे समजते. तसे झाल्यास गडहिंग्लजसह ‘चंदगड’च्या राजकारणालाही कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीची उमेदवारी तत्कालीन आमदार राजेश पाटील यांना मिळाल्यामुळे शिवाजीराव पाटील यांना अपक्ष लढावे लागले. निवडणुकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपाची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेवून पक्षबांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. किंबहुना, पक्ष वाढीसाठीच त्यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चंदगड तालुक्यातील राजकारण पक्षापेक्षा व्यक्तीनिष्ठच राहिले आहे. त्यामुळेच त्यांनी गडहिंग्लज तालुक्यातच अधिक लक्ष घातले असून जिल्हा परिषदेची निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्धार केला आहे. यासाठीच त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर, कॉंग्रेसचे अप्पी पाटील यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
भाऊ ‘अप्पीं’ना का भेटले ?
गडहिंग्लज कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार राजेश पाटील यांचे समर्थक असून ‘अप्पीं’चे पारंपारिक विरोधक आहेत. पताडे हेच भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात प्रबळ दावेदार आहेत.त्यामुळे राजेश पाटील यांना शह देण्यासाठीच ‘शिवाभाऊं’नी थेट ‘अप्पीं’नाच आॅफर दिली आहे.
विधानसभेच्या गेल्या तीनही निवडणुका लढवलेल्या अप्पींचे चिरंजीव श्रीशैल हेदेखील भडगाव जि.प.साठी इच्छूक आहेत. म्हणूनच शिवाभाऊंनी प्रमुख कार्यकर्त्यांसह अप्पींची भेट घेतली.तसेच ‘भाजपा’च्या चिन्हावर निवडणूक लढवल्यास अप्पींच्या गटाला ताकद देण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याचे समजते.
कार्यकर्त्यांशी 'चर्चा' करूनच निर्णय!
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे लढलेल्या अप्पींनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश करून खासदार शाहू छत्रपतींच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. परंतु, ‘महाविकास’कडून विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांना अपक्ष लढावे लागले.
निवडणुकीनंतर ते राजकारणापासून दूर असून परवा आमदार सतेज पाटील यांच्या दौऱ्याकडेही त्यांनी पाठ फिरवली. म्हणूनच, शिवाभाऊंनी त्यांची भेट घेतली. मात्र, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच ‘निर्णय’ घेणार असल्याचे अप्पींनी त्यांना सांगितल्याचे समजते.