कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पूरक भूमिका घेऊन मंत्री हसन मुश्रीफ महायुतीच्या विचाराशी प्रतारणा करीत आहेत. सहकारी संस्थांच्या निवडीत मुश्रीफ महाविकास आघाडीच्या नेत्यांना पदे देऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या महायुतीच्या जीवावर मंत्री झालो त्या महायुतीच्या ताब्यात जिल्ह्याचे राजकारण राहिले पाहिजे, अशी भूमिका मुश्रीफ यांनी घ्यायला हवी. अन्यथा मुश्रीफ यांच्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे दाद मागावी लागेल, असा इशारा भाजपचे जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला.पत्रकात म्हटले आहे, महायुतीचे खायचे आणि महाविकास आघाडीचे गायचे अशी भूमिका मुश्रीफ यांनी सोडून द्यावी. मुश्रीफ यांचा राजकीय इतिहास पाहता ते प्रत्येक वेळी आपली सोयीची भूमिका घेतात. महायुती सत्तेत असताना सध्याच्या घडीला त्यांनी महायुतीशीच प्रामाणिक राहून काम करायला हवे. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार केला. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रकाश अबिटकर, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांचा प्रचार केला. आता डोंगळे यांची गोकुळ दूध संघात महायुतीचाच अध्यक्ष असावा, अशी भूमिका योग्य आहे. यामुळे मंत्री मुश्रीफ यांनीही गोकुळमध्ये महायुतीचा धर्म पाळावा. जिल्ह्यात महायुतीचे नेते म्हणून मंत्री मुश्रीफ नेतृत्व करतात. सहकारी संस्थांतही मुश्रीफ यांची भूमिका ही महायुतीला पूरकच पाहिजे.
'महायुतीचे खायचे अन् महाविकास आघाडीचे गायचे' ही भूमिका मुश्रीफांनी सोडून द्यावी - नाथाजी पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 12:17 IST