बिग बॉस विजेत्या विशाल निकमने घेतले अंबाबाई अन् जोतिबाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 18:53 IST2022-01-01T18:28:19+5:302022-01-01T18:53:49+5:30

बिग बॉस मराठी'चं तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकमने आज नववर्षाच्या पहिल्या दिवशीच कोल्हापुरात येवून श्री. अंबाबाई व जोतिबाचे दर्शन घेतले.

Bigg Boss winner Vishal Nikam pays homage to Ambabai and jotiba | बिग बॉस विजेत्या विशाल निकमने घेतले अंबाबाई अन् जोतिबाचे दर्शन

बिग बॉस विजेत्या विशाल निकमने घेतले अंबाबाई अन् जोतिबाचे दर्शन

कोल्हापूर : 'बिग बॉस मराठी' तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकमने आज नववर्षाच्या पहिल्या दिवशीच कोल्हापुरात येवून श्री. अंबाबाई व जोतिबाचे दर्शन घेतले. विजयानंतर विशालचे गावकऱ्यांनी जंगी मिरवणूक काढून स्वागत केले. यानंतर त्याने पंढरपूरला जात विठ्ठल- रूक्मिणीचे देखील दर्शन घेतले होते. यानंतर आज त्याने कोल्हापूरला भेट दिली.

विशाल सोबत त्याचा मित्र विकास पाटीलही होता. त्यांनेही अंबाबाई व जोतिबाचे दर्शन घेतले. बिग बॉसच्या घरात या दोघांची मैत्री जमली. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर या दोघांनी मिळून जोतिबाचे दर्शन घेतले आहे. यावेळी विशाल निकमने घोड्यावरून एक फेरफटका देखील मारला. याचे काही फोटो देखील समोर आले आहेत. 

छोट्या पडद्यावर यंदा 'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व चांगलंच गाजलं. १०० दिवस घरात राहिलेल्या विशाल निकमने यात बाजी मारत बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र 'विशाल'मय वातावरण झालं होते. चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 

जोतिबा मालिकेत साकारली जोतिबाची भूमिका 

विशाल निकमने जोतिबा मालिकेत जोतिबाची भूमिका साकारली होती. या मालिकेने त्याला महाराष्ट्राच्या घराघरात पोहचवले. या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापूरातच झाले आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर आज त्याने जोतिबाचे दर्शन घेतले आहे.

विशाल निकम मुळचा सांगली जिल्ह्यातील

विशाल निकमचा जन्म 10 फेब्रुवारीला देवखिंडी या गावात झाला होता. हे गाव सांगली जिल्ह्यात आहे. विशालला अभिनयासोबतच फिटनेसची देखील आवड आहे. त्याने जोतिबा, साता जल्माच्या गाठी अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु त्याला खरी ओळख बिग बॉस मराठीने मिळवून दिली आहे. बिग बॉस मराठीमुळे विशालला प्रचंड लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे. 

Web Title: Bigg Boss winner Vishal Nikam pays homage to Ambabai and jotiba