पंतप्रधानांशी थेट भेटीने भारावली ‘संयमी’
By Admin | Updated: July 13, 2014 00:47 IST2014-07-13T00:45:26+5:302014-07-13T00:47:20+5:30
‘लोकमत’ संस्काराचे मोतीने जुळला योग : मोदी भेटीइतकेच विमानाचे अप्रुप

पंतप्रधानांशी थेट भेटीने भारावली ‘संयमी’
कोल्हापूर : दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आणि विमानातील पहिलाच प्रवास करताना खूप मज्जा आली, घरी येऊन कधी आई-वडिलांना व माझ्या मैत्रिणीला या सर्व गोष्टी सांगेन, असे झाले होते, अशी बोलकी प्रतिक्रिया ‘लोकमत’ संस्काराचे मोती ‘निसर्ग सफारी’ या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या कोल्हापुरातील अल्फोन्सा इंग्लिश मेडियम स्कूलमधील सहावीमध्ये शिकत असलेल्या संयमी प्रदीप दराडे हिने व्यक्त केली.
या स्पर्धेसाठी निवड झालेल्या महाराष्ट्र व गोव्यातील एकूण ३७ विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घालून देण्याचा अभूतपूर्व उपक्रम ‘लोकमत’ने राबविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने भारावलेल्या या विद्यार्थ्यांना हवाई सफरीसह राजधानी दिल्लीतील विविध ठिकाणे पाहण्याची सुवर्णसंधी पहिल्यांदाच मिळाली.
या अनुभवाबाबत संयमी म्हणाली, पहिल्यांदाच विमानात बसणार होते, त्यामुळे खूप उत्सुकता व थोडी भीती वाटत होती. सकाळी विमानात बसल्यानंतर थोडी भीती कमी झाली. विमानाच्या खिडकीतून सर्वत्र निळे आकाश आणि मधूनमधून पांढरे ढग दिसत होते. त्यानंतर खाली छोटी-छोटी गावे, नद्या दिसत होत्या हे पाहून मी खूपच रोमांचित झाले.
दिल्लीतील संसद भवन येथे नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेलो. या ठिकाणी सुरक्षारक्षकांच्या गराड्याने थोडी भीती वाटली. मोठ्या हॉलमध्ये आम्हाला बसविण्यात आले होते. या ठिकाणी काही वेळातच नरेंद्र मोदी आले.
त्यांनी नमस्कार विद्यार्थी हो... असे मराठीतून उद्गार काढून आमच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी सर्वांचे नाव विचारून, आपको हवाई जहाज मे बैठने के बाद डर तो नही लगा़? असा प्रश्न त्यांनी विचारल्यानंतर आम्ही हसत हसत हो म्हणताच त्यांनी हसण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना आगे जाकर आप क्या बनना चाहते है, असे विचारले, प्रत्येकाने आपण कोण होणार हे सांगितले. यामुळे आम्ही भारावलो. यानंतर आम्ही राजघाट, इंडिया गेट, राजपथ रोड पाहिला व पुन्हा परतीचा विमान प्रवास सुरू केला.
‘लोकमत’मुळे संधी
लोकमत ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमामुळे आमच्या घरातील पहिल्यांदाच संयमीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची व विमान प्रवास करण्याची सुवर्णसंधी मिळाली. यामुळे आम्ही ‘लोकमत’चे खूप आभारी आहोत. ‘लोकमत’च्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतोच, पण विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र वाचण्याची सवय लागते. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होते. या सुवर्णसंधीसाठी अल्फोन्सा स्कूलमधील प्रिन्सिपल रोस्मी झेविअर्स आणि फादर टॉम यांचे सहकार्य लाभल्याने त्यांचेही आम्ही आभारी आहोत, अशी भावना संयमीसह तिचे वडील प्रदीप व आई मनीषा दराडे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)