अपंग असूनही शिक्षणासाठी लढली, थेट इंग्लंडमधून मदत आली; कोल्हापुरातील भाग्यश्री जाधवचा असाही संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:28 IST2024-12-18T13:27:22+5:302024-12-18T13:28:31+5:30
कोल्हापूर : वडील बेकरी पदार्थाचे विक्रेते, स्वत:ही पायाने अधू असल्याने आलेले कायमचे अपंगत्व. मात्र, उच्च शिक्षण घ्यायचेच, ही खूणगाठ ...

अपंग असूनही शिक्षणासाठी लढली, थेट इंग्लंडमधून मदत आली; कोल्हापुरातील भाग्यश्री जाधवचा असाही संघर्ष
कोल्हापूर : वडील बेकरी पदार्थाचे विक्रेते, स्वत:ही पायाने अधू असल्याने आलेले कायमचे अपंगत्व. मात्र, उच्च शिक्षण घ्यायचेच, ही खूणगाठ बांधल्याने तिच्या जिद्दीपुढे नियतीनेही हात टेकले. याच जिद्दीतून तिने सीईटीला ९७.४७ पर्सेंटाईल मिळवत कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवला.
मात्र, येथील कृषी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण परिसरात विखुरलेल्या प्रयोगशाळा आणि वर्गांमध्ये हजेरी लावणे तिच्या अपंगत्वामुळे अवघड होत असल्याचे लक्षात येताच वोकहार्ट या फार्मसी कंपनीचे इंग्लंडमध्ये कार्यरत शशांक कांबळे, कोल्हापूरचे अमित माटे आणि उपेंद्र गोखले या दानशुरांनी तिला बॅटरीवर चालणारी स्वयंचलित तीनचाकी सायकल देत तिचा अडखळत सुरू असलेला प्रवास सुसाट केला आहे.
भाग्यश्री जाधव असे या जिद्दी मुलीचे नाव. शासकीय कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असलेली भाग्यश्री पायाने अधू आहे. अपंगत्वावर मात करत तिने बारावीपर्यंत चांगले गुण मिळवले. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीटमध्ये चांगले गुण मिळवूनही तिचा शंभर टक्के अपंगत्वाचा दाखला आड आला. परिणामी तिची मेडिकलच्या प्रवेशाची संधी हुकली. मात्र सीईटीला ९७.४७ पर्सेंटाईल मिळवत तिने येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवला.
कृषी महाविद्यालयाच्या परिसरात विखुरलेल्या प्रयोगशाळा आणि वर्गांमध्ये हजेरी लावणे तिला अवघड होते. तरीही तिने पहिल्या सत्रात आपला शैक्षणिक आलेख उंचावत ठेवला. आपल्या अपंगत्वाला आपल्या आकांक्षांच्या आड येऊ न देता ती मैत्रिणींच्या मदतीने प्रत्येक वर्ग आणि प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर पोहोचायची. तिच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी अजय देशपांडे यांनी वोकहार्ट या फार्मसी कंपनीचे इंग्लंडमध्ये कार्यरत असलेले शशांक कांबळे यांच्याशी संपर्क साधला.
कांबळे यांच्यासह अमित माटे आणि उपेंद्र गोखले या तीन मित्रांनी बॅटरीवर चालणारी स्वयंचलित तीनचाकी सायकल भाग्यश्रीला घेऊन दिली. कृषी महाविद्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात सहयोगी अधिष्ठाता डॉ. सतीश बुलबुले यांच्या हस्ते तिला ही सायकल प्रदान केली.