Kolhapur: भंडाऱ्याच्या उधळणीत उत्साहात पार पडला बाळूमामांचा पालखी सोहळा, अश्वनृत्य पाहण्यास भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:54 IST2026-03-18T12:53:52+5:302026-03-18T12:54:10+5:30
‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं ऽऽ’च्या गजर, ढोल कैताळाचा निनाद

Kolhapur: भंडाऱ्याच्या उधळणीत उत्साहात पार पडला बाळूमामांचा पालखी सोहळा, अश्वनृत्य पाहण्यास भाविकांची गर्दी
वाघापूर : महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा यात्रेत मंगळवारी पालखी सोहळा उत्साहात पार पडला. लाखो भाविकांनी या भंडारा सोहळ्यास उपस्थिती लावली. ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं ऽऽ’च्या गजरात, ढोल कैताळाच्या निनादात भंडाऱ्याच्या मुक्तहस्ते उधळणीने आदमापूर न्हाऊन निघाले.
भडारा उत्सव काळात, प्रवचन, कीर्तन, हरिभजन, जागर, रथोत्सव, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले, तसेच आज पालखी सोहळा उत्साहात पार पडला. आज बुधवारी अमावस्या यात्रा असून, गुरुवारी भंडारा यात्रेची सांगता होईल.
मंगळवारी सकाळी बाळूमामांच्या मंदिरातून पालखी सोहळा निघाला. या सोहळ्यात बाळूमामा देवालय समितीचे अध्यक्षांसह सर्व विश्वस्त, विठ्ठल पुजारी, मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी मरगुबाई मंदिर येथे आली. तेथून ती पुन्हा गावातील अनेक गल्लीतून मार्गस्थ झाली.
अश्वांच्या नृत्यांचे आकर्षण
पालखी सोहळ्यात बाळूमामांच्या बग्ग्यातील अश्वांच्या नृत्यांचे आकर्षण ठरले होते. या पालखी सोहळ्यातील सहभागी भक्तांना गावातील अनेक तरुण मंडळांनी सरबत, अन्नछत्र आदींचे आयोजन केले होते. सायंकाळी गावाच्या आड विहिरीत भंडारा टाकून पुन्हा बाळूमामांच्या मंदिरात पालखी सोहळा दाखल होऊन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी प्रशासकीय अधिकारी, देवस्थानचे विश्वस्त, कर्मचारीवर्ग, ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामविकास अधिकारी, भुदरगड, करवीर यांसह जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागप्रमुख, देवस्थानचे कर्मचारी, ग्रामस्थ व युवक, स्वयंसेवी सेवक उपस्थित होते.