Leopard in Kolhapur: मृत्यूच्या दाढेतून बचावलो; बिबट्याचे दात दंडात आरपार गेले, गंभीर जखमीची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:37 IST2025-11-13T17:37:10+5:302025-11-13T17:37:25+5:30
चोवीस तास उलटून गेले तरी वनविभाग अनभिज्ञ

Leopard in Kolhapur: मृत्यूच्या दाढेतून बचावलो; बिबट्याचे दात दंडात आरपार गेले, गंभीर जखमीची व्यथा
आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : येथील ताराबाई पार्कात बाळू अंबाजी हुंबे (रा. मूळ गगनबावडा, सध्या रा. भोसलेवाडी, कोल्हापूर) यांच्यावर मंगळवारी बिबट्याने हल्ला केला. दंडाचा जोरात चावा घेतला. यामध्ये ते जखमी झाले आहेत. त्यांना कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र, घटना घडून चोवीस तास उलटून गेले तरी याची माहिती वनविभागास नाही. हुंबे यांनीच ही माहिती दिली. हातावर पोट असणाऱ्या हुंबे यांच्या हाताचा चावा घेतल्याने त्यांच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हुंबे यांचे वय ६५ वर्षे. ते कुटुंबासह भोसलेवाडी येथे राहतात. हुंबे दिवसभर फिरून बागकाम करतात. मंगळवारीही ते ताराबाई पार्कातील हॉटेलनजीकच्या घरातील बागकाम करीत होते. त्यावेळी अचानक बिबट्या आला. उंच भिंतीवरून उडी मारून आल्याने त्यांना काहीही कळण्याआधीच उजव्या हाताच्या दंडाचा जोरात चावा होता. बिबट्याने जोरदार चावा घेतल्याने त्याचे दात दंडाच्या आरपार गेल्याने ते घायाळ झाले.
त्यांना तातडीने ‘सीपीआर’मध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार करून त्यांना सेवा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या जखमी झालेल्या हाताची पूर्णपणे हालचाल बंद झाली आहे. परिणामी ते कुटुंब चिंताग्रस्त बनले आहेत. पत्नी भांडीकुंडी करते, तर हुंबे हे बागकाम करून चरितार्थ करतात. हुंबे यांच्या हाताची हालचालच थांबल्याने त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
बिबट्याने हल्ला केल्यानंतर उपचाराचे पैसे मिळतात. वनविभागाकडून भरपाई मिळते, याचीही माहितीही त्यांना नाही. घटना घडून चोवीस तास झाले तरी वनविभागाचे अधिकारी भेटलेले नाहीत, कोणी मला पाहण्यासाठीही आलेले नाही, असे ते हताश होऊन सांगतात.
युद्धाचाच प्रसंग
बिबट्याने हल्ला कसा केला व मी कसा बचावलो, याची माहिती ते युद्धाच्या प्रसंगाप्रमाणे हुंबे सांगत होते. ते म्हणाले, मृत्यूच्या दाढेतून बचावलो. बिबट्याचा चावा इतका जोरात होता. माझे कुटुंब आता उघड्यावर आले आहे. मला तातडीने वनविभागाने मदत करावी, अशी मागणी हुंबे यांनी केली.