बालन्याय विधेयकामुळे बालगुन्हेगारांना चाप
By Admin | Updated: December 24, 2015 00:33 IST2015-12-24T00:17:53+5:302015-12-24T00:33:26+5:30
१६ वर्षांच्या बालगुन्हेगारांचा प्रौढ गुन्हेगारांच्या यादीत समावेश

बालन्याय विधेयकामुळे बालगुन्हेगारांना चाप
एकनाथ पाटील - कोल्हापूर -खून, चोरी, आदी गुन्ह्यांमध्ये १८ वर्षांपर्यंतच्या मुलांचा सहभाग वाढत आहे. या गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याने ते भयानक गंभीर गुन्ह्यांमधूनही सहीसलामत सुटत होते. वाढत्या बालगुन्हेगारीच्या घटनांमुळे पाल्यांसह पोलिसांची डोकेदुखीही वाढली होती. बहुचर्चित ‘बालन्याय सुधारणा विधेयक’ राज्यसभेत मंजूर झाल्याने बालगुन्हेगारांचे वय आता १८ वरून १६ करण्यात आले आहे. एकंदरीत १६ ते १८ वर्षांतील मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. या नवीन कायद्यामुळे आता बालगुन्हेगारीला चांगलाच चाप बसणार आहे.
मित्राचा मोबाईल पाहून परिस्थिती नसतानाही आई-वडिलांकडे मोबाईल, सायकल, दुचाकी, किमती कपडे यासाठी मुले हट्टी बनली आहेत. आई-वडिलांनी त्याला विरोध करीत परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला तर त्याचेही त्यांना वावडे वाटते. अखेर चोरी करण्याकडे त्यांचे पाय वळतात. बऱ्यापैकी नववी ते बारावीपर्यंतच्या मुलांकडून मोबाईल, दुचाकी चोरी असे प्रकार जास्त घडत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, खून, बलात्कारांमध्येही बालगुन्हेगारांचे प्रमाण जास्त आहे. १८ वर्षांखालील बालगुन्हेगाराला ‘विधिसंघर्ष बालक’ म्हणून पोलीस ताब्यात घेतात. त्याला पोलीस कोठडीत ठेवता येत नसल्याने त्याच्या आई-वडिलांना बोलावून त्याला समज दिली जाते. त्याला सुधारण्याची हमी आई-वडिलांनी दिली तर त्याला त्यांच्या ताब्यात दिले जाते. जे बालगुन्हेगार सुधारण्याच्या मानसिकतेत नाहीत, त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली जाते. राधानगरी येथे वडिलांचा खून, राजारामपुरी परिसरात चैनीसाठी मोबाईल व दुचाकींची चोरी अशा गंभीर घटना गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये कोल्हापुरात घडल्या आहेत. गंभीर गुन्ह्यांतून सहीसलामत सुटत असल्याने १८ वर्षांखालील मुलांना कायद्याची भीतीच राहिली नव्हती. सन २०१२ मधील ‘निर्भया’ प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराला कोणत्या कायद्याच्या आधारावर अटकेत ठेवायचे, याबाबत पुरेसे कायदेच नाहीत, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी या आरोपीची सुटका करण्याचे निर्देश दिले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘बालन्याय सुधारणा विधेयक’ राज्यसभेत मंजूर झाल्याने आता १६ वर्षांच्या मुलाने एखादा गुन्हा केला तर तो ‘प्रौढ गुन्हेगार’ म्हणून पोलीस रेकॉर्डवर नोंदविला जाणार आहे.
या कायद्यामुळे बालगुन्हेगारांचे प्रमाण कमी होणार आहे, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याचे मुलांचे धाडस होणार नाही. त्यांच्यावर या कायद्याचा चांगलाच वचक बसेल.
- धन्यकुमार गोडसे,
पोलीस निरीक्षक
बालन्याय विधेयकामध्ये बालगुन्हेगारांचे वय १८ ऐवजी १६ वर्षे करून चांगला निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन कायद्यामुळे मुले गुन्हेगारीकडे वळण्याचे धाडस करणार नाहीत.
- अॅड. चंद्रकांत बुधले,
विशेष सरकारी वकील