आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरू करणार, मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:36 IST2025-05-13T16:36:12+5:302025-05-13T16:36:48+5:30
राज्यस्तरीय पहिल्या फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारांचे कोल्हापुरात वितरण

आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरू करणार, मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली घोषणा
कोल्हापूर : परिचारिकांना ज्याप्रमाणे फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले जाते, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील इतर विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात जागतिक परिचारिका दिनानिमित्त सोमवारी आबिटकर यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन ६ पारिचारिकांना राज्यस्तरीय नाईटिंगेल पुरस्काराने, तर ११ परिचारिकांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे ‘परिचारिकांची काळजी घ्या, अर्थव्यवस्था मजबूत करा’ हे घोषवाक्य होते.
आबिटकर म्हणाले, शंभर वर्षांपूर्वी प्लेगमध्ये आरोग्य खात्याने केलेल्या कामाची आजही प्रशंसा केली जाते, त्यानंतर कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेने केलेल्या कामाला तोड नाही. यापुढेही या क्षेत्रातील सर्व घटक असेच समर्पित भावनेने काम करतील याची खात्री आहे. राज्यात सध्या ३५ एएनएम, २३ जीएनएम प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. यावर्षी इचलकरंजी येथे नवीन जीएनएम प्रशिक्षण संस्था, तसेच सातारा, सिंधुदुर्ग व नाशिक येथे बीएससी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, आईआधी ज्याचे तोंड बाळ पाहते त्या परिचारिकेच्या कामाला माझा सलाम. राज्यभरातून आलेल्या या भगिनींकडे या खात्याला प्रकाश देणाऱ्या मंत्र्यांनी भावाप्रमाणे अधिक लक्ष द्यावे. कोल्हापूर आणि मिरज हे वैद्यकीय हब म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
परिचारिकांनी हातात दिवे घेऊन सेवेबाबत सामूहिक प्रतिज्ञा घेतली. डॉ. विजय कंदेवाड यांनी प्रास्तविक केले. डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी आभार मानले. प्रारंभी नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. दिलीप माने, सहायक संचालक डॉ. नीलिमा सोनावणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, योगेश साळी उपस्थित होते.