औरंगाबादच्या महिला भाविकाची दागिन्यांची पर्स लंपास -मध्यवर्ती बसस्थानकतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 17:09 IST2019-04-06T17:08:16+5:302019-04-06T17:09:48+5:30
कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या औरंगाबाद येथील भाविकांना ‘तुमचे पैसे रस्त्यावर पडले आहेत,’ असे भासवून कारच्या पाठीमागील सीटवर ठेवलेली ...

औरंगाबादच्या महिला भाविकाची दागिन्यांची पर्स लंपास -मध्यवर्ती बसस्थानकतील घटना
कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या औरंगाबाद येथील भाविकांना ‘तुमचे पैसे रस्त्यावर पडले आहेत,’ असे भासवून कारच्या पाठीमागील सीटवर ठेवलेली पर्स चोरट्यांनी हातोहात लंपास केली. पर्समध्ये १५ हजार रोकड, साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज होता. मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात शुक्रवारी (दि. ५) रात्री हा प्रकार घडला.
अधिक माहिती अशी, कृषी सेवा केंद्र व्यावसायिक आशिष गौरठाकूर हे पत्नी वैशाली आणि मुलांसह शुक्रवारी (दि. ५) अंबाबाई दर्शनासाठी कोल्हापुरात आले होते. रात्री ते व मुलगी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात राहण्यासाठी हॉटेलची विचारपूस करीत होते. त्यांच्या पत्नी वैशाली या कारमध्ये एकट्याच बसल्या होत्या. यावेळी निळा शर्ट व काळी पॅँट घातलेला तरुण कारजवळ आला. त्याने कारमध्ये बसलेल्या वैशाली यांना ‘तुमचे पैसे खाली पडले आहेत,’ असे सांगितले. त्या लगबगीने कारमधून खाली उतरल्या. रस्त्यावर पडलेल्या १० रुपयांच्या पाच नोटा उचलत असताना त्या चोरट्याने कारमधील त्यांची पर्स लंपास केली. हा प्रकार वैशाली यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून पती आशिष गौरठाकूर धावत कारजवळ आले; परंतु चोरटे पसार झाले होते. आजूबाजूला त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते सापडले नाहीत. त्यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा माग काढत आहेत.
चोरट्यांचा वावर जास्त
शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्याने पर्यटक, भाविकांची कोल्हापूरला येण्यासाठी गर्दी वाढत आहे. त्याचाच फायदा चोरट्यांनी उचलला आहे. पर्स, बॅगा चोरून नेण्याचे प्रकार वाढत आहेत. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चोरट्यांचा बिनधास्त वावर आहे. दिवसाआड चोऱ्या घडत आहेत. शाहूपुरी पोलीलिसांनी या परिसरात चोवीस तास पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी भाविकांतून मागणी होत आहे.