सत्तेसाठी समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न, अभिनेता किरण माने यांनी केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:48 IST2025-03-28T12:47:40+5:302025-03-28T12:48:37+5:30
बहुजन नायक पुरस्काराने इंद्रजित सावंत यांचा नागरी सत्कार

सत्तेसाठी समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न, अभिनेता किरण माने यांनी केला आरोप
कोल्हापूर : प्रशांत कोरटकर हे एक साधे प्यादे आहे, त्याच्या आडून मेंदूचा ताबा घेऊन राजकीय फायद्यासाठी महापुरुषांच्या बदनामीचे मोठे षडयंत्र रचले जात आहे, असा आराेप अभिनेता किरण माने यांनी केला. सत्तेसाठी आणि सत्ता अबाधित ठेवण्यासाठी समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न वर्चस्ववाद्यांकडून केला जात असल्याचे हे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.
हिंदू बहुजन महासंघ, मूळनिवासी क्षत्रिय परिषद, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा योद्धा, कोल्हापूर मावळा, शिवप्रबोधिनी, भवानी फाउंडेशन, संभाजी ब्रिगेड, मराठा समाज सेवा संघटन, राजमाता जिजाऊ ब्रिगेडतर्फे येथील शाहू स्मारक भवनात गुरुवारी शिव-शंभो-फुले-शाहू-आंबेडकर सन्मान परिषदेत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा बहुजन नायक पुरस्काराने किरण माने आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.
माने म्हणाले, छावा चित्रपटाच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न इंद्रजित सावंत यांनी उधळून लावला. शिवरायांच्या महाराष्ट्रात कोरटकरमुळे कलुषित विचारांची माणसे आजही आहेत हे सिद्ध झाले. त्यांच्यामागे सावरकर, गोळवलकर, पुरंदरे यांच्यासारखे कलुषित विचार पसरवणारी विचारधारा आहे. नाटक, सिनेमा, कथा, कादंबऱ्यातून पराक्रमी महापुरुषांची बदनामी केली जात आहे. यामागे प्रोपोगंडा हेच एकमेव हेतू आहे, तो धुडकावून लावून इंद्रजित सावंत यांनी क्रांतीचे वारे पेटविले आहे. त्याचा वणवा पेटवू या.
सिनेमा क्षेत्रापासून सावध रहा, असा सल्ला देत माने यांनी चार ऐतिहासिक तथ्यांसोबत एक दोन खोटी माहिती घुसडून लोकांच्या मेंदूवर ताबा घेण्याची ही सनातनी पद्धत आहे. यातून गद्दारांची तीव्रता कमी करण्याचे हे षडयंत्र हाणून पाडू. आपण शिकतोय पण मेंदूचा वापर करत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही पायदळी तुडवण्यात येणारी मूल्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या ताकदीतून जोपासू या, असे आवाहन माने यांनी केले.
खचाखच सभागृह
या परिषदेला पुरोगामी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. सभागृह खचाखच भरले होते. मध्यला पॅसेजमध्येही लोक बसले होते. शेवटी तर व्यासपीठावर जाऊन काही जणांना बसायला जागा देण्यात आली. गेल्या अनेक दिवसांत या सभागृहाने प्रथमच एवढी गर्दी अनुभवली.