Kolhapur: लिपिकाला बढती दिल्याने संस्थाचालकावर केली करणी, स्मशानभूमीत फोटोला टोचल्या टाचण्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:27 IST2025-06-30T12:27:22+5:302025-06-30T12:27:36+5:30
परिसरात भीतीचे वातावरण

Kolhapur: लिपिकाला बढती दिल्याने संस्थाचालकावर केली करणी, स्मशानभूमीत फोटोला टोचल्या टाचण्या
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील एका नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि प्राचार्य यांच्या छायाचित्रांचा वापर करून अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. करवीर तालुक्यातील वडकशिवाले येथून बाचणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमीत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
स्मशानभूमीत या पदाधिकाऱ्यांचे फोटो घेऊन त्यावर गुलाल, हळद-कुंकू टाकून टाचण्या मारण्यात आल्या होत्या. तसेच परिसरात पाच नारळ, सहा काळ्या बाहुल्या, लिंबू, गुलाल व तांदळासह काही अघोरी साहित्य सापडले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अमावस्येच्या रात्री अशा प्रकारच्या भानामती व जादूटोण्याचे प्रकार घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
स्मशानातील खांबाला काळ्या बाहुल्या लावून त्यावर महिला व तरुणींचे फोटो चिकटवून वशीकरणसदृश क्रिया करण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकरणातील संबंधित पदाधिकाऱ्यांचा गावाशी कोणताही थेट संबंध नसताना त्यांचे फोटो वापरण्यात आल्यामुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे वडकशिवाले परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत शिक्षण संस्थेच्या वतीने अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली असून, "फोटो वापरून जादूटोणा, भानामती करणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. बुरसटलेल्या मानसिकतेला कोणतीही दाद दिली जाणार नाही", असे स्पष्ट केले आहे.
पोलिस आणि जादूटोणा विरोधी पथकाने लक्ष द्यावे
वडकशिवाले येथील स्मशानभूमीत वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे गावातील महिला, तरुणी आणि नागरिक भयभीत आहेत. इस्पूर्ली पोलिसांनी आणि जादूटोणा विरोधी पथकाने या प्रकारांची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पारळे यांनी केली आहे.