अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या जीवनाची ‘सिद्धी’, दहावीत मिळवले ९७ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:03 IST2025-05-14T16:03:19+5:302025-05-14T16:03:50+5:30
कोल्हापूर : दहा वर्षांपूर्वी अपहरण आणि खून झालेल्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांची मुलगी सिद्धी ऊर्फ सूची ...

अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या जीवनाची ‘सिद्धी’, दहावीत मिळवले ९७ टक्के
कोल्हापूर : दहा वर्षांपूर्वी अपहरण आणि खून झालेल्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांची मुलगी सिद्धी ऊर्फ सूची राजू गोरे हिने दहावीच्या (सीबीएसई) परीक्षेत ९७.२० टक्के गुण मिळवले. दहा वर्षांच्या शैक्षणिक प्रवासादरम्यान न्यायालयीन लढाईत तिचा सहभाग होता. आईचे छत्र हरपल्यानंतर अनेक संकटांचा सामना करीत तिने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.
अश्विनी बिद्रे-गोरे यांचे अपहरण आणि खून झाला त्यावेळी त्यांची मुलगी सिद्धी ही पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आईच्या मृत्यूनंतर गुन्ह्याचा तपास आणि न्यायालयीन लढाईत तिचा बराच वेळ गेला. तरीही तिने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमधून तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीच्या परीक्षेत तिने ९७.२० टक्के गुण मिळवून आईला आदरांजली वाहिली.
तिच्या शिक्षणात कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी वडील राजू गोरे यांनी विशेष खबरदारी घेतली. घरातील नातेवाईक आणि घोडावत स्कूलमधील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन तिला लाभले. पुढे नीटची तयारी करून वैद्यकीय शिक्षण घेण्याची तिची इच्छा आहे.