Kolhapur: लाच प्रकरण: कमाईपेक्षा जास्त संपत्तीचा संशय, कारंडेंच्या मालमत्तेची होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 11:41 IST2024-05-23T11:40:10+5:302024-05-23T11:41:53+5:30
अश्विनी कारंडे हिला न्यायालयीन कोठडी

Kolhapur: लाच प्रकरण: कमाईपेक्षा जास्त संपत्तीचा संशय, कारंडेंच्या मालमत्तेची होणार चौकशी
कोल्हापूर : बिगरशेती परवाना देण्यासाठी कागल तहसीलदार कार्यालयात ३० हजार रुपयांची लाच घेणारी अव्वल कारकून अश्विनी अतुल कारंडे (वय ४६) हिच्या संपत्तीची चौकशी होणार आहे. तिचा पती जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहायक पदावर आहे. कारंडे दाम्पत्याने मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.
दरम्यान, लाचखोर कारंडे हिला न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तक्रारदाराने भाडेतत्त्वावर घेतलेली जमीन बिगरशेती करण्यासाठी अव्वल कारकून अश्विनी कारंडे हिने तक्रारदाराकडे ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ६० हजारांवर तडजोड होऊन त्यातील ३० हजारांचा पहिला हप्ता घेताना कारंडे ही मंगळवारी (दि. २१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिच्या न्यू शाहूपुरी येथील आलिशान बंगल्याची झडती घेतली.
मात्र, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. कारंडे हिचा पती जिल्हा परिषदेत आहे. या दोघांच्या मिळकतीपेक्षा त्यांची संपत्ती अधिक असल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळे दोघांच्या मालमत्तांची चौकशी केली जाणार आहे. कारंडे दाम्पत्य न्यू शाहूपुरी परिसरात वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते. अलीकडेच त्यांनी याच परिसरात सुमारे एक कोटी रुपये किमतीचा आलिशान बंगला खरेदी केला. दागिन्यांसह स्थावर, जंगम मालमत्तांमध्ये त्यांनी मोठी गुंतवणूक केल्याचा संशय आहे. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी परदेशात आहे, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. कारंडे हिची जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकीर्दही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याबाबत तक्रारी देण्याचे आवाहन उपअधीक्षक सरदार नाळे यांनी केले आहे.
कार भरून साहित्य लंपास?
कारंडे दाम्पत्याच्या न्यू शाहूपुरी येथील बंगल्याच्या आवारात दोन कार होत्या. कागलमध्ये कारवाई झाल्याचे समजताच एका व्यक्तीने बंगल्यातील साहित्य कारमध्ये भरून त्या कार बंगल्यापासून दूर रस्त्याकडेला लावल्या. रात्री एकच्या सुमारास दोन्ही कार निघून गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. कारमधून बंगल्यातील चीजवस्तू, रोकड, मालमत्ताची कागदपत्रे लंपास केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.