कोल्हापूर : डीजे, लेसर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. ध्वनिमापक यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवून मंडळांना जागेवरच आवाज नोंदणीची पावती दिली जाईल, असे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी गणेश मंडळांच्या बैठकीत गुरुवारी (दि. ३१) स्पष्ट केले. येथील शाहू स्मारक भवनात झालेल्या बैठकीत मंडळांनी मिरवणूक मार्गातील खड्डे, विद्युत तारा आणि देखाव्यांच्या वेळांबद्दल सूचना मांडल्या.‘परंपरांचे जतन करणाऱ्या कोल्हापुरात गणेशोत्सव उत्साहातच साजरा व्हावा. पोलिसही यात सहभागी होतील. मात्र, मंडळांनी कायद्याची चौकट पाळावी. प्रबोधनात्मक देखावे सादर करून स्वस्थ आणि सुरक्षित कोल्हापूर ही संकल्पना मांडावी,’ असे आवाहनही त्यांनी केले.गणेशोत्सवाची लगबग सुरू होताच पोलिसांनी शहर आणि आसपासच्या गावांमधील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. राजारामपुरी मंचचे अनिल घाडगे यांनी लेसरबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. मंडपांसाठी खोदल्या जाणाऱ्या खड्ड्यांचे पैसे महापालिकेने घेऊ नयेत, अशी मागणी केली. लालासाहेब गायकवाड, आर. के. पोवार, किशोर घाडगे यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी केली.सरलाताई पाटील आणि पूजा नायकवडे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र रांगा आणि सीसीटीव्ही वाढविण्याची विनंती केली. संभाजी जगताप यांनी विसर्जनानंतर परत येणाऱ्या वाहनांसाठी वेगळा मार्ग असावा, अशी सूचना केली. दिलीप देसाई, नीलेश बनसोडे, अशोक देसाई यांनी सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत महाद्वार रोडवर रेंगाळणाऱ्या मिरवणुकीकडे लक्ष वेधले.
प्रथमेश मोरे यांनी स्ट्रक्चरसाठी नियमावली तयार करण्याचे आवाहन केले. सोमेश चौगले यांनी बंद झालेला गणराया अवॉर्ड पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. गजानन यादव, सुशील भांदिगरे, प्रथमेश मोरे, रामदास काटकर, आदींनी विसर्जन मार्गावर लोंबळणाऱ्या विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्या काढण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार, उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह सर्व मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणराया अवॉर्ड पुन्हा सुरू करणारगेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले गणराया अवॉर्ड पुन्हा सुरू करणार असल्याचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी जाहीर केले. तसेच डीजे आणि लेसरसाठी नको तर प्रबोधन आणि सामाजिक कार्यासाठी मंडळांनी स्पर्धा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
खड्डे बुजवण्यासाठी दोन कोटीशहरातील खड्डे बुजवण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पाऊस कमी होताच काम सुरू होईल, अशी माहिती महापालिकेच्या प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी बैठकीत दिली. तसेच क्रशर खण आणि पंचगंगा नदी घाटावरही आवश्यक सुविधांचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.