कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात कुठे गळती, कुठे सुटलेले दगड, ऑइल पेंटने सौंदर्य हरवले; ‘पुरातत्त्व’कडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:10 IST2025-07-17T13:09:37+5:302025-07-17T13:10:35+5:30
आठ दिवसांत सविस्तर अंदाजपत्रक

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात कुठे गळती, कुठे सुटलेले दगड, ऑइल पेंटने सौंदर्य हरवले; ‘पुरातत्त्व’कडून पाहणी
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील १४३ कोटींच्या कामाला मंजुरी मिळताच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने त्यावर तातडीने काम सुरू केले आहे. बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांसह पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुमारे दीड तास मंदिर परिसराचा काेपरान्कोपरा पिंजून काढत गळती, दगडांची सुटलेली अडक, शिल्पांची दुरवस्था, रंगामुळे विद्रूप झालेल्या दगडी भिंती, सळ्या, पट्ट्यांची जोड अशा सर्व कामांची पाहणी केली. यावर पुरातत्त्व खात्याकडून पुढील आठ दिवसांत देवस्थानला अंदाजपत्रक दिले जाईल.
अंबाबाई मंदिराच्या १४४० कोटींच्या विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यात मंदिर वास्तुप्रकाराच्या जतन संवर्धनाचा समावेश आहे. या टप्प्याला मंगळवारी उच्चाधिकार समितीने मान्यता दिल्यानंतर बुधवारपासून देवस्थान समिती कामाला लागली. बुधवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे, पुरातत्त्व खात्याचे सहायक संचालक विलास वहाणे, देवस्थानच्या सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी आर्किटेक्ट अमोल पाटणकर, समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, पुरातत्त्व विभागाचे उदय सुर्वे यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. पुढील दोन दिवस या सर्व कामांची छायाचित्रे काढली जाणार आहेत.
पाहणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी आठ दिवसांत जतन-संवर्धनाच्या कामाचे सविस्तर अंदाजपत्रक देण्याची सूचना केली. अंदाजपत्रक आल्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया राबवली जाईल. निधी येईल त्याप्रमाणे जतन संवर्धनाचे काम सुरू होईल.
याचे होणार जतन संवर्धन
- मंदिराच्या छताला काही ठिकाणी गळती लागली आहे, काही ठिकाणी दगडांची अडक सुटली आहे, कुठे दगडांना भेगा पडल्या आहेत, कुठे सुटलेले दगड लोखंडी सळ्या आणि पट्ट्यांनी जोडले आहेत, दगडी बांधकामावर रंग, ऑइल पेंट लावल्याने विद्रूपीकरण झाले आहे.
- मंदिराच्या बांधकामावरील ६४ योगिनींंसह देवदेवतांचे शिल्प, काळ पेताळ, अप्सरा या मूर्ती तसेच कोरीव काम कालौघात खराब झाले आहे.
- मंदिराच्या आवारात अनेक खासगी मंदिरे आहेत. त्या सर्व मंदिरांचाही जतन संवर्धनात समावेश केला गेला आहे. या मंदिरांमध्येही डागडुजी तसेच मूळ अंबाबाई मंदिराला साजेसे रूप दिले जाणार आहे.