Kolhapur Municipal Election 2026: निवडणूक जाहीर होताच दोन्ही आघाड्यांकडून मोर्चेबांधणीला वेग, प्रशासनाचीही लगबग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:04 IST2025-12-16T12:03:41+5:302025-12-16T12:04:53+5:30
काँग्रेसच्या आजपासून मुलाखती, भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या

Kolhapur Municipal Election 2026: निवडणूक जाहीर होताच दोन्ही आघाड्यांकडून मोर्चेबांधणीला वेग, प्रशासनाचीही लगबग
कोल्हापूर : गेल्या चार महिन्यांपासून कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुती होणार की फिसकटणार, महाविकास आघाडीचं काय होणार अशा चर्चांना सोमवारी बऱ्यापैकी पूर्णविराम मिळाला आहे. महापालिकेच्या ८१ जागांसाठी चार सदस्यीय पद्धतीनुसार २० प्रभागांत ही निवडणूक होईल. महापालिका प्रशासन आणि राजकीय पातळीवरही घडामोडींना वेग आला.
महापालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशीच लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेसच्या समितीने इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा केली असून, त्याचा अहवाल उद्या वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. या अहवालानंतरच कुणाच्या काय अपेक्षा आहेत हे पाहून आघाडीचा निर्णय अंतिम केला जाणार आहे, तर महायुतीतील भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सोमवारी विकासकामांच्या उद्घाटनाला एकत्र येत महायुतीची घडी बसण्याचे संकेत दिले आहेत.
वाचा : बिगुल वाजला.. उमेदवारांनी शड्डू ठोकला; जागावाटपासाठी महायुती त्रिसदस्यीय समिती नेमणार
भाजपने त्यांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून, महायुतीमधील जागा वाटप अंतिम झाल्यानंतर त्यांचे उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. शिंदेसेनेकडूनही इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या आजपासून मुलाखती
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडे ३५० हून अधिक जणांनी उमेदवारी मागितली आहे. या इच्छुकांच्या मुलाखती मंगळवार व उद्या बुधवारी होणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. महापालिकेची निवडणूक इंडिया आघाडी म्हणून लढणार असून, काँग्रेसने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे आमदार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अशी हाेणार थेट लढत
महायुती : भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, रिपाइं (आठवले गट)
इंडिया आघाडी : काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकापसह डावे पक्ष, आप व संभाव्य मनसे.