मुलांना टॉपला नेण्याची स्पर्धा, त्यात कॉलेजचा पट होतोय अर्धा; करिअरसाठी पालक जागरुक
By समीर देशपांडे | Updated: August 6, 2025 17:23 IST2025-08-06T17:22:20+5:302025-08-06T17:23:07+5:30
दर्जेदार शिक्षणासाठी शाळा, कॉलेजनी सज्ज व्हावे

AI Generated Image
समीर देशपांडे
कोल्हापूर : मुलांना इंजिनिअर करायचे आहे, डॉक्टर करायचे आहे. सध्याचा कनिष्ठ महाविद्यालयाचा अभ्यासक्रम या परीक्षांच्या पात्रतेसाठीच्या तयारीला पूरकही आहे. परंतु नियमित अभ्यास आणि प्रचंड सराव घेण्याचा अभाव असल्याने पालकच मुला-मुलींना अकॅडमीमध्ये घालण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, अशी एक साखळीच तयार झाली असून, ‘कनिष्ठ महाविद्यालयात नाव, पण अकॅडमीत धाव’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पहिली ते पाचवी प्राथमिक, सहावी ते आठवी उच्च प्राथमिक, नववी, दहावी माध्यमिक आणि ११ वी ते १२ उच्च माध्यमिक, अशी त्रिस्तरीय शिक्षण पद्धती आपल्याकडे सध्या कार्यरत आहे. परंतू एकदा का चौथी इयत्ता झाली की पालकांना अकॅडमीचे वेध लागायला सुरुवात होते. सैनिक शाळा, नवोदय, एनएमएमएस, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षा, अकॅडमीतील इतर उपक्रम पालकांना भुरळ घालतात. त्याठिकाणी मजबूत शुल्क आकारले जात असल्याने साहजिकच शिक्षकही त्याच पद्धतीने मुलांकडून अभ्यास करवून घेतात. यामुळे ग्रामीण भागामध्ये अधिकाधिक मुलामुलींना अकॅडमीमध्ये घालणाऱ्या पालकांची संख्या वाढू लागली आहे.
अकरावी, बारावीला तर वेगळाच पॅटर्न आता गेल्या दहा वर्षांत रूढ झाला आहे. आता इंजिनिअरिंगसाठी जीई आणि मेडिकलसाठी नीट परीक्षा सक्तीची आहे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वपरीक्षांसाठीही आता स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा असल्यामुळे मुलांची या परीक्षांची तयारी व्हावी यासाठी खासगी अकॅडमीमध्ये मुला-मुलींना घातले जाते. त्यासाठी वार्षिक फी सव्वा लाखापासून दोन लाख रुपयांपर्यंत देण्यासही पालक मागेपुढे पाहत नाहीत. याचवेळी त्यांचे नाव मात्र शासनमान्य शिक्षण संस्थेच्या ११ आणि १२ वीच्या वर्गात घातलेले असते. परीक्षेलाही तो त्याच महाविद्यालयातून बसतो.
विद्यार्थी अकॅडमीत गर्क
स्पर्धा परीक्षांसाठी परीक्षेचे तंत्र आणि नियमित सराव आवश्यक असल्याने पारंपरिक अकरावी, बारावी शिकवणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यासाठी मर्यादा आहेत. याउलट भरभक्कम शुल्कामुळे अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवर बसून त्यांच्याकडून नियमित सराव करून घेण्यात येतो. याच बलस्थानाच्या जोरावर कनिष्ठ महाविद्यालयांत रिकामे वर्ग आणि अकॅडमीमध्ये विद्यार्थी गर्क’ अशी स्थिती आहे.
नोंदणी नाही, मान्यताही नाही
अनेक अकॅडमींची नेमकी नोंदणी होत नाही. तर ती सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाच्या कोणत्याही परवानगीचीही गरज भासत नाही. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे जंगलात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केलेल्या अकॅडमींच्याही आता टोलेजंग इमारती झाल्या आहेत.
जिल्ह्यातील आकडेवारी
- माध्यमिक शाळा - १,०६९
- उच्च माध्यमिक शाळा - ३२८
- शिक्षक संख्या - १३, ६३९
- शिक्षकेतर कर्मचारी - ५,४७३
- मुले - १,९५,०३१
- मुली - १,६१,२३६
- एकूण - ३, ५६,२६७
कनिष्ठ महाविद्यालयात अनेकदा तास वेळेवर होत नाहीत आणि दर्जेदार अध्यापन होत नाही. त्यामुळे मुले येत नाहीत. मुलांचा मौल्यवान वेळ वाया जातो. याउलट जरी फी घेतली तरी अकॅडमीमध्ये मुलांकडून अभ्यास करवून घेतला जातो. जो त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी मोलाचा ठरतो. -एम. बी. सूर्यवंशी, कोल्हापूर, पालक