वाटाघाटी फिसकटल्या; कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी गुरुवारपासून संपावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:27 IST2025-04-22T15:27:44+5:302025-04-22T15:27:56+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका कर्मचारी संघाने केलेल्या २३ मागण्यांवर कोणताही मार्ग निघाला नसल्याने अत्यावश्यक सेवा वगळता महापालिकेचे सुमारे ३४०० कर्मचारी ...

वाटाघाटी फिसकटल्या; कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी गुरुवारपासून संपावर
कोल्हापूर : महानगरपालिका कर्मचारी संघाने केलेल्या २३ मागण्यांवर कोणताही मार्ग निघाला नसल्याने अत्यावश्यक सेवा वगळता महापालिकेचे सुमारे ३४०० कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जात आहेत. सोमवारी प्रशासनाबरोबर झालेल्या वाटाघाटी फिसकटल्यामुळे हा संप अटळ असल्याचे कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले यांनी पत्रकारांना सांगितले.
कर्मचारी संघटनेने कायद्यातील कलम २४ अन्वये महानगरपालिका प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात नियम २० अन्वये मागण्यांची यादी सोबत जोडून दि. ११ एप्रिल रोजी रीतसर संपाची नोटीस प्रशासनास देण्यात आली आहे. या नोटिशीस अनुसरून कामगार अधिकारी राम काटकर यांनी सोमवारी दुपारी या मागण्यांच्या संबंधाने चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपायुक्त पंडित पाटील, सहायक आयुक्त संजय सरनाईक यांच्यासह कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले, अध्यक्ष दिनकर आवळे, उपाध्यक्ष विजय चरापले, अजित तिवले, रवींद्र काळे, अनिल साळोखे उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस उपायुक्त पाटील यांच्यासमवेत दि. ११ मार्च रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांच्या संबंधाने चर्चा झाली. या कार्यवृत्तांतील १७ मागण्यांबाबत जी चर्चा झाली होती त्यामधील एकाही मागणीवर प्रशासकीय स्तरावर सकारात्मक निर्णय झालेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे, अशा संतप्त भावना भोसले यांनी व्यक्त केल्या. २३ मागण्यांच्या संबंधाने प्रशासनाची काय तयारी आहे, यावर चर्चा झाली असता प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
कर्मचारी संघाच्या मागण्या
- आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक साधनसामग्री द्या
- लाड-पागे समिती शिफारशीनुसार सेवानिवृत्त, मृत कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना ३० दिवसांत नियुक्ती देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करा
- कर्मचाऱ्यांना गणवेश, गमबूट, चप्पल, रेनकोट याचे वाटप करा.
- सातव्या वेतन आयोगातील जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या बारा महिन्यांचा वेतन फरक द्या.
- कर्मचाऱ्यांना सलग १२ वर्षे व २४ वर्षे आश्वासित योजनेचा लाभ द्या
- तीन वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणाऱ्यांच्या बदल्या ताबडतोब करा
- ६० वर्षांवरील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून त्यांना आर्थिक लाभ द्या