Kolhapur News: शिपाई म्हणून नियुक्ती, कामावर नसताना उचलला तब्बल २२ लाख रूपये पगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 12:21 IST2023-06-17T12:21:23+5:302023-06-17T12:21:43+5:30
संस्थेचे संचालक, शालेय समिती अध्यक्ष, माजी मुख्याध्यापक यांनी केला आरोप

Kolhapur News: शिपाई म्हणून नियुक्ती, कामावर नसताना उचलला तब्बल २२ लाख रूपये पगार
कोल्हापूर: प्रत्यक्षात कामावर येण्याआधीचा १३ वर्षांचा २२ लाख रूपयांचा पगार उचलण्याचा प्रकार आजरा तालुक्यातील महागोंड येथील आप्पासाहेब गायकवाड हायस्कूलमध्ये घडला आहे. संस्थेचे संचालक बचाराम पाटील, शालेय समिती अध्यक्ष तुकाराम मुसळे, माजी मुख्याध्यापक एस. के. पाटील आणि अॅड. डॉ. एस. बी. पाटणकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत हा आरोप केला.
महागोंड येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या या हायस्कूलमध्ये अमित बाळासाहेब ढोणुक्षे यांची शिपाई म्हणून नियुक्त करण्यात आली. ही नियुक्ती प्रत्यक्षात १ मार्च २०२२ रोजी करण्यात आली आहे. मात्र ही नियुक्ती १६ फेब्रुवारी २००९ रोजी झाल्याची बोगस कागदपत्रे तयार करून आतापर्यंतचा २२ लाख रूपये पगाराचा फरकही शासनाकडून मिळवण्यात आला आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.
२००९ साली ढोणुक्षे यांची निवड झाली असली तर त्यावेळी एस. के. पाटील हे मुख्याध्यापक होते. परंतू त्यांच्या प्रस्तावावर पाटील यांची सही नसून त्यांच्या निवृत्तीनंतर असलेलेले मुख्याध्यापक सुरेश पाटील यांची सही आहे. असे असतानाही तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी या पदाला मंजुरी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
तसेच याबाबत १० एप्रिल २०२३ रोजी शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्याकडे सुनावणी होवूनही याबद्दल अजूनहीनिर्णय देण्यात आलेला नाही असा आरोप यावेळी करण्यात आला.
या शिपायाच्या नियुक्तीबाबत आठ आठवड्यात आदेश द्यावा, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्याने संबंधित पदाला मान्यता देण्यात आली आहे. न्यायालयाचा अवमान होऊ नये म्हणूनच हा आदेश देण्यात आला आहे - एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर