Kolhapur: ‘गोकुळ’चे संचालक मंडळ आता २५ सदस्यांचे, सभेत पोटनियम दुरुस्तीस मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:54 IST2025-09-10T11:53:49+5:302025-09-10T11:54:18+5:30

शौमिका महाडिक यांनी केला विरोध, दहा वर्षांत पहिल्यांदाच सव्वादोन तास चालली सभा

Approval to increase the number of directors of Gokul Dudh Sangh to 25 in the meeting, approval to amend the bylaws in the meeting | Kolhapur: ‘गोकुळ’चे संचालक मंडळ आता २५ सदस्यांचे, सभेत पोटनियम दुरुस्तीस मंजुरी

छाया-आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या ६३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची संख्या २१ वरून २५ करण्यास पोटनियम दुरुस्तीस मान्यता देण्यात आली. विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी या दुरुस्तीस सभेत विरोध केला. नेत्यांच्या नावांची घोषणाबाजी वगळता सभा शांततेत पार पडली.

अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संघाच्या पंचतारांकित वसाहतीमधील पशुखाद्य कारखाना कार्यस्थळावर सभा झाली. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच सव्वादोन तास सभा चालली.

वाचा: म्हैस वासाच्या दुधाला १२ तर गायीला ८ रुपये देणार, नविद मुश्रीफ यांची घोषणा 

तब्बल एक तासाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, संघाच्या उलाढालीत २९६ कोटीने वाढ झाली असून, दूध उत्पादकांना राज्यातील सर्वाधिक दूध खरेदी दर दिला आहे. संघाच्या ठेवीबरोबरच गुंतवणुकीमध्ये मोठी वाढ करण्यात यश आले असून, प्रत्येक तालुक्याला संघात प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी संचालक मंडळाची संख्या २५ करण्याचा निर्णय घेतला असून, त्या पोटनियमास मंजुरी द्यावी, असे आवाहन केल्यानंतर उपस्थितांनी हात उंचावत मंजुरी दिली. 

वाचा: मुश्रीफ-सतेज पाटील गट्टी घट्ट, गोकुळ'च्या सभेत निवडणुकीतील संभाव्य युतीत पडला मिठाचा खडा

या मुद्द्याला हरकत घेत संचालक वाढीस आमचा विरोध असल्याचे शौमिका महाडिक यांनी सांगितले. कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी अहवाल वाचन केले. शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आभार मानले. सभेला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह सत्तारूढ आघाडीचे नेते उपस्थित होते.

‘अमल’ यांचेही मानले आभार

अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री व जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी ‘गोकुळ’च्या प्रगतीत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. विशेष म्हणजे, त्यांनी आमदार अमल महाडिक यांचाही उल्लेख केला.

मागील कारभाराचा अहवाल म्हणून फोटो नाहीत

ताईच्या (शौमिका महाडिक) प्रश्नांना लाडका भाऊ निश्चितच समाधानकारक उत्तरे देईल, असे अगोदरच सांगत अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, अहवालात भाजपच्या स्थानिक नेत्यांचे फोटो का नाहीत? असा प्रश्न आहे. हा अहवाल मागील कारभाराचा आहे, लहान भावाच्या कारकिर्दीतील नसल्याने कदाचित फोटो छापले नसतील.

चुयेकरांच्या फोटोबद्दल दिलगिरी

संघाने दूध संस्थांना दिलेल्या घड्याळ भेटवस्तूमध्ये संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांचा फोटो नसल्याचे एका संस्था प्रतिनिधीने निदर्शनास आणून दिले. यावर, अनावधानाने फोटो राहिला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी सांगितले.

बाप से बेटा सवाई..

नविद मुश्रीफ हे ‘गोकुळ’मध्ये पहिल्यांदाच संचालक व अध्यक्ष झाले. निवडणुकीच्या तोंडावरील सभा असल्याने ‘नविद’ यांच्या नेतृत्वाचा कस लागला होता; पण त्यांनी सव्वादोन तास सभा चालवून आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. दहा वर्षे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे केडीसीसी बँकेची सभा एकहाती चालवतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवल्याची चर्चा सभास्थळी होती.

सभेच्या बाहेर सत्तारूढ गटासोबत, आत विरोधात

शौमिका महाडिक या दुपारी बारा वाजता सभास्थळी आल्यानंतर त्या अध्यक्ष नविद मुश्रीफ व सत्तारूढ गटाच्या संचालकांसोबत संस्था प्रतिनिधींच्या स्वागतासाठी उभा राहिल्या. सभेच्या ठिकाणी मात्र त्या सभासदांमध्ये बसल्या होत्या.

Web Title: Approval to increase the number of directors of Gokul Dudh Sangh to 25 in the meeting, approval to amend the bylaws in the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.