Kolhapur: सुशाबाईंचे निधन, धक्क्याने गौराबाईंनीही सोडला प्राण!, नौकुडमधील हृदयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:57 IST2025-06-09T16:56:49+5:302025-06-09T16:57:05+5:30

एकीची रक्षा..दुसरीचे दहन, सख्ख्या बहिणी..सख्ख्या जावा 

another sister also passed away due to the shock of her sister's death In Naukud Gadhinglaj taluka kolhapur | Kolhapur: सुशाबाईंचे निधन, धक्क्याने गौराबाईंनीही सोडला प्राण!, नौकुडमधील हृदयद्रावक घटना

Kolhapur: सुशाबाईंचे निधन, धक्क्याने गौराबाईंनीही सोडला प्राण!, नौकुडमधील हृदयद्रावक घटना

गडहिंग्लज : वयोमानानुसार आलेल्या किरकोळ आजारपणामुळे सुशाबाईंचे निधन झाले. त्यांच्या रक्षाविसर्जनाची तयारी सुरू असतानाच गौराबाईंनीही प्राण सोडला. सासर-माहेर गावातच असणाऱ्या दोघीही सख्ख्या बहिणी व सख्ख्या जावा होत्या. नौकुड येथील या हृदयद्रावक घटनेमुळे हलकर्णी पंचक्रोशीसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

हकीकत अशी, नौकुड येथील वयोवृद्ध शेतकरी मारुती मांगले व संतराम मांगले हे सख्खे चुलत भाऊ आहेत. सुशाबाई या मारुती यांच्या, तर गौराबाई या संतराम यांच्या अर्धांगिनी होत्या. सुशाबाईंच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, तर गौराबाईंच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

लहानपणापासून दोघीही एकत्र वाढल्या, दोघींची लग्नही एकाचवेळी झाली. जावा-जावा असूनही त्यांची मैत्री घट्ट होती. एकमेकांची सुख-दु:ख वाटून घेत कौटुंबिक जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत दोघींनीही सुखाचा संसार केला. म्हणूनच, सुशाबाईंच्या मृत्यूने आलेल्या विरहाच्या धक्क्याने गौराबाईंनीही जगाचा निरोप घेतला.

घराघरांशी ऋणानुबंध

सुशाबाईंचा मुलगा जोतिबा हा पोस्टमन असून त्यांचे घर म्हणजेच पोस्ट ऑफिस आहे. त्यामुळे घरात नेहमी लोकांचा राबता असतो; परंतु त्या घरी येणाऱ्या प्रत्येकाची अगत्याने विचारपूस करून चहा दिल्याशिवाय सोडायच्या नाहीत. त्यामुळे घराघरांशी त्यांचे ऋणानुबंध जुळले होते.

एकीची रक्षा..दुसरीचे दहन..!

धाकटी बहीण सुशाबाईंच्या रक्षाविसर्जनाची तयारी सुरू असतानाच थोरली बहीण गौराबाईंचे निधन झाले. त्यामुळे सुशाबाईंच्या रक्षाविसर्जनाला आलेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांना गौराबाईंवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. तिचे रक्षाविसर्जन, आज (सोमवारी) आहे.

नव्वदीतील भावांनाही धक्का

जाधव घराण्यातील गौराबाई व सुशाबाई यांना बैजू व बाबू हे दोन भाऊ आहेत. गावातील आबालवृद्ध त्यांना गौराआई व सुशाआई या नावानेच हाक मारत. दोघीही अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ, परोपकारी व सरळमार्गी होत्या. सुख-दु:खाच्या प्रसंगात लोकांच्या मदतीला त्या धावून जायच्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण नौकुड गावावर शोककळा पसरली आहे. दोन्ही बहिणींचा पाठोपाठ मृत्यू झाल्याने त्यांच्या नव्वदीतील भावांनाही धक्का बसला आहे.

Web Title: another sister also passed away due to the shock of her sister's death In Naukud Gadhinglaj taluka kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.