Kolhapur- Phulewadi Fire Station building slab collapses: थांबा थांबा.. ढिगाऱ्याखाली अजून एकजण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:13 IST2025-10-01T12:12:40+5:302025-10-01T12:13:55+5:30
नातेवाईकांचा आक्रोश

Kolhapur- Phulewadi Fire Station building slab collapses: थांबा थांबा.. ढिगाऱ्याखाली अजून एकजण
कोल्हापूर : थांबा थांबा.. कोसळलेल्या स्लॅबखाली आणखी एकजण अडकलाय, असा आवाज आला अन् बचाव पथकासह उपस्थित अधिकाऱ्यांच्या काळजात धस्स झालं. महापालिकेच्या फुलेवाडी येथील फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर त्यातील पाच जखमींना बाहेर काढल्यानंतर बचाव पथकाने सुटकेचा निश्वास सोडला होता.
स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी नाही ना याची खात्री अधिकारी वारंवार करत होते. मात्र, बचाव पथकाने आता कुणीच नाही असे सांगितलेही. मात्र, मजुरांपैकीच एकाने एक महिला दिसत नसल्याचे सांगत ‘थांबा थांबा, कोसळलेल्या स्लॅबखाली आणखी एकजण अडकलाय,’ असा आवाज दिला अन् सगळेच स्तब्ध झाले. बचाव पथकाने पुन्हा शोधमोहीम सुरू केली.
वाचा- कोल्हापूर महापालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला; १ ठार, ५ जखमी
बचावपथक पुन्हा इमारतीत गेल्याने आणखी कितीजण अडकलेत याबाबत गर्दीमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. ते पाहून अधिकाऱ्यांचीही घालमेल वाढली. मात्र, तब्बल दोनवेळा बचावपथकाने शोध घेऊन स्लॅबखाली कुणीच नसल्याचे सांगताच अधिकाऱ्यांसह गर्दीनेही आकाशाकडे पाहत हात जोडले.
माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनीही केली मदत
घटना घडल्यानंतर या परिसरातील माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यापासून ते बचावकार्यात अडथळा येऊ नये यासाठी प्रशासनाला मदत केली.
नातेवाईकांचा आक्रोश
ही घटना घडल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश पाहून अनेकजण हळहळले. कारण ज्या पद्धतीने स्लॅब कोसळला ते पाहता आणि झालेला आवाज ऐकल्यानंतर अनेकजण मलब्याखाली अडकले असल्याची भीती होती. सर्वच कामगार एकमेकांशी संबंधित आणि नातेवाईक असल्याने नातेवाईकांचा आक्रोश बघायला मिळाला.