कोल्हापूर : येथील रमणमळा परिसरात काल, सोमवारी (दि.१३) ऑस्ट्रेलियातून आलेला ओमायक्रॉनचा संशयित रुग्ण सापडल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. यानंतर आज यात आणखीन एका संशयित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.आज आढळून आलेला संशयित रुग्ण नायझेरियातून कोल्हापुरात आला होता. न्यू शाहुपुरी परिसरातील हा रुग्ण आहे. ते नायझेरियातून ख्रिसमसच्या सुट्टीसाठी कोल्हापुरात आले होते. संशयित रुग्ण नायझेरियात खासगी कंपनीत नोकरीस आहेत. काल, सोमवारी त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून प्रशासनाने त्याचा स्वॅब पुण्याला पाठवला आहेत. त्यामुळे पुढील अहवाल आल्यानंतरच त्याचे नेमके निदान होणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.विदेशातून आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर ती ओमायक्रॉनची संशयित धरून तिच्यावर उपचार केले जातात. म्हणून हा रुग्ण संशयित मानला जातो. मात्र कोल्हापुरातही आता ओमायक्रॉनची संशयित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन अशा संशयितावर लक्ष ठेवून आहे.
कोल्हापुरात आढळला आणखीन एक ओमायक्रॉनचा संशयित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 19:51 IST